मुंबई : खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी बनवण्यावेळी महत्वाची भूमिका पार पाडली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांचे थेट विधाने हे महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. संजय राऊत हे आपल्या परखड विधानांमुळे कायमच चर्चेत असतात. मात्र, हे परखड विधाने महाविकास आघाडी तुटण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. संजय राऊत यांनी 'सामना' अग्रलेखातून शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच काँग्रेसचा अध्यक्ष हे खर्गे जरी असले तरी पक्ष सोनिया गांधी चालवतात असे राऊत म्ङणाले होते. संजय राऊत यांनी आमच्या पक्षाबाबत चोंबडेपणा करू नये, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते.
महाविकास आघा़डीत संजय राऊतांची भूमिका - शिवसेनेची गळचेपी करणाऱ्या भाजपला जागा दाखवण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पावार यांच्या मागे लागून महाविकास आघाडीची निर्मिती केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द फिरवत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी उरकला. बाजूला ठेवून सरकार स्थापन केल्याने शिवसेना संतप्त झाली. देशभरात ऑपरेशन लोटस राबवणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेनेने कट्टर विरोधक असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली. देशात या नव्या आघाडीची चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शिवसेनेला सामावून घेण्यासाठी राऊतांनी ताकद पणाला लावली होती.
महाविकास आघाडीबाबत वादग्रस्त विधाने : महाविकास आघाडीत शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. तिन्ही वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यानंतरही संजय राऊत यांनी आघाडीची बाजू सक्षमपणे मांडली. इतकेच नव्हे तर, तिन्ही पक्षाच्यावतीने भाजपला प्रतिउत्तर देत समन्वयाची भूमिका निभावली होती. मात्र आता संजय राऊत यांच्या सदस्य वादग्रस्त विधाने, अग्रलेखामुळे महाविकास आघाडीत सगळेच काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. शरद पवार हे वारस तयार करण्यास अपयशी ठरल्यामुळे त्यांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे, असे संजय राऊत 'सामना' अग्रलेखातून म्हणाले होते. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष हे मल्लीकार्जुन खर्गे आहेत. मात्र, काँग्रेसचा सर्व कारभार सोनिया गांधी चालवत आहेत, असे विधानही संजय राऊत यांनी काँग्रेसबाबत केले होते.
'सामना' अग्रलेखात राष्ट्रवादीवर टीका : संजय राऊत आता उघडपणे काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करताना दिसून येतात. संजय राऊत यांनी दैनिक सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरती टीका केली. शरद पवार यांच्या नंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा, बुडखा, बुंधा सर्वकाही महाराष्ट्रात आहे. त्यामुळे पवारांच्या सर्व सहकाऱ्यांना ते महाराष्ट्रातच हवेत. पवार हे राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नाही, असा वारसदार निर्माण करण्यास ते अपयशी ठरल्याची टीका केली होती.
शरद पवारांचे राऊतांना प्रत्युत्तर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपला उत्तराधिकारी तयार करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका दैनिक सामनात संजय राऊतांनी केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना सामनामध्ये प्रकाशित झालेल्या संपादकीयवर प्रत्युत्तर दिले आहे.
'संजय राऊत यांना आम्ही काय केले ते माहीत नाही. राष्ट्रवादीचे वैशिष्ट्ये म्हणजे आम्ही सर्व चर्चा करतो. आमची मते भिन्न आहेत, पण आमची कौटुंबिक बाब असल्याने आम्ही बाहेर प्रचाराला जात नाही. एक कुटुंब म्हणून, पक्षाला पुढे कसे न्यायचे, नवीन नेतृत्व कसे करायचे हे आम्हा सर्वांना माहीत आहे." अशा लिखानाला आम्ही महत्व देत नाहीत. त्यांना लिहण्याचा आधिकार आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही काय करत आहोत हे आम्हाला माहीत आहे. त्यावर आम्ही समाधानी आहोत.' - शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
महाविकास आघाडीत धुसफुस? : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील आमदार बॅग भरून भाजपसोबत जाण्यास तयार असल्याचेही यापूर्वी विधान केले होते. काँग्रेसचे राज्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही संजय राऊतंकडून निशाणा साधण्यात येत होता. एकीकडे महाविकास आघाडी मजबूत होत असताना दुसरीकडे संजय राऊत यांच्या सततच्या विधानामुळे पक्षात धुसफुस वाढली आहे. संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
शरद पवार साहेबांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे. मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. असं असताना संजय राऊत यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? त्यांना काय अडचण आहे? त्यांना असं वाटतं का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे? - छगन भुजबळ - राष्ट्रवादी नेते
संजय राऊतांचे काँग्रेसबद्दल विधान - संजय राऊत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर देखील टीका केली होती. काँग्रेस खरगे नव्हे तर, सोनिया गांधी यांच्याकडे बघून पक्ष चालतो, असे वादग्रस्त विधान केले होते. नाना पाटोले यांनी यावरून संताप व्यक्त करत, राऊतांनी चोंबडेपणा करू नये, अशा शब्दांत खडसावले होते. महाविकास आघाडीला झालेल्या विविध निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आगामी निवडणुकीत भाजपला शह द्यायचा असेल तर महाविकास आघाडी भक्कम असायला हवी. परंतु, संजय राऊतांकडून मीठ चोळण्याचा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
संजय राऊतांची वायफळ बडबड : राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. त्याचा परिणाम म्हणून पुण्यामध्ये झालेल्या कसबा, पिंपरी चिंचवडची पोट निवडणूकमध्ये सक्षम पद्धतीने निकाल येतो आहे. राज्यातील लोकांना महाविकास आघाडी हवी आहे. त्यामध्ये शिवसेनेचे नेते प्रवक्ते संजय राऊत हे अतिशय वायफळ, चुकीच्या पद्धतीने बडबड करत आहेत.
जोपर्यंत आवरणार नाही तोपर्यंत संजय राऊत थांबणार नाहीत. संजय राऊत यांची कृती अशीच राहिली तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याशिवाय राहणार नाही - काकासाहेब कुलकर्णी, काँग्रेस प्रवक्ते
संजय राऊतांना आवरा : आमचे नेते सन्माननीय नाना पटोले यांच्यावरती टीका करत आहेत. राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. माझी विनंती आहे दुर्दैवाने, महाविकास आघाडी तुटू नये. महाविकास आघाडी अतिशय सक्षमपणे काम करत आहे. संजय राऊत साहेबांना उद्धव ठाकरे यांनी आवरावे असे काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी म्हटले आहे.