मुंबई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांच्यविरोधात कोण लढणार हा प्रश्न उभा राहीला होता. मात्र, त्यांच्या विरोधात रिपाइच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वरळी मतदारसंघात आंबेडकर विचारधारेचा गड असून आघाडीने ही जागा आपल्याला द्यावी अशी मागणीही खरात यांनी केली.
हेही वाचा - बांगड्या भरणारे हात आता कमजोर नाहीत - आदित्य ठाकरे
ठाकरे घराण्याने आतापर्यंत शिवसेनेतून अनेकांना नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष केले. मात्र, ठाकरे घराण्याने कधीही निवडणूक लढवलेली नाही. मात्र, ठाकरे घराण्याचा हा इतिहास बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याने वरळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सचिन अहिर यांना शिवसेनेत घेऊन विरोधकांना उमेदवार मिळणार नाही याचा बंदोबस्त शिवसेनेने केला आहे.
हेही वाचा - नागपूर: उपमुख्यमंत्री होणार की नाही, या विषयाचा पेपर मी फोडणार नाही- आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी व्यक्त केली आहे. तसे पत्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या विरोधीपक्षांना घेऊन आघाडी करत असेल तर त्या आघाडीचा उमेदवार म्हणून आपण आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवू असे पत्रात म्हटले आहे.
आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला -
वरळी हा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. शोषित समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचे प्रश्न मांडता यावेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वरळी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या मतदार संघात आंबेडकरी मतदान मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास आपण या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे खरात यांनी सांगितले.
कोण आहेत सचिन खरात -
सचिन खरात हे पुणे येथील असून काही वर्षापूर्वी आठवले यांच्या रिपाइचे कार्यकर्ते होते. आठवले यांनी शिवसेना आणि भाजपासोबत महायुती केल्याने खरात पक्षातून बाहेर पडले. त्यांनी युवकांना सोबत घेऊन रिपाइ (खरात गट) हा आपला पक्ष स्थापन केला. आंबेडकरी चळवळीतील प्रश्न सोडवण्यासाठी सचिन खरात यांनी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयात तसेच विधानभवनात पत्रके भिरकावून आंदोलन केलेले आहे. कोरेगाव-भीमामध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी खरात यांनी 2018 साली मंत्रालयासमोर आंदोलन केले होते. खरात यांनी गळ्यात मडके आणि कमरेला झाडू बांधून सरकारचा निषेध केला होता.
हेही वाचा - ही जनआशीर्वाद यात्रा माझ्यासाठी तीर्थयात्रा - आदित्य ठाकरे