मुंबई - काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग खुला झाला असल्याने त्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) काँग्रेसकडून विधीमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. यासाठी काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री शर्यतीत आहेत. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यात अशोक चव्हाण यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसचा अपवाद सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपनेही आपला विधानमंडळ नेता निवडला आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत काँग्रेसने मात्र आपला विधीमंडळ नेता निवडला नव्हता. मात्र, आता राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे त्रिशंकू सरकार बनणार असल्याचे स्पष्ट झाल्याने काँग्रेसने विधीमंडळ नेता निवडीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
हेही वाचा - पवार-ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता
काँग्रेसच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी शुक्रवारी दुपारी एक वाजता विधानभवन परिसरात काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीमध्ये काँग्रेसकडून आपला विधीमंडळ नेता निवडला जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्या गळ्यात विधीमंडळ नेते पदाची माळ पडेल त्यांना पुढील पाच वर्षे राज्याचे उपमुख्यमंत्री पदही मिळणार आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये रात्री उशिरा बैठक, आज मोठ्या घोषणेची शक्यता
राज्यात सत्तास्थापनेसाठी मागील काही दिवसात सुरू असलेल्या घडामोडी लक्षात घेतल्या तर यासाठी अशोक चव्हाण यांनी दिल्लीमध्ये आपले वजन वापरले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठीच ते दिल्लीमध्ये अनेक दिवसांपासून ठाण मांडून होते. त्यामुळे काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी त्यांचीच निवड होईल, असेही एका काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.