मुंबई - महायुतीमधून शिवसेना बाहेर पडल्याने मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून उमेदवार देण्यासाठी चाचपणी केली जात आहे. त्यासाठी राजकीय पक्षांशी चर्चा केली जात असताना मुंबईच्या महापौर पदावर शिवसेनेचाच महापौर बसेल, असा दावा शिवसेनेने केला आहे. तर काँग्रेसने पक्ष काय भूमिका काय घेईल यावरही ही निवड अवलंबून आहे.
पाठिंबा देण्याचे भाजपचे काँग्रेस - राष्ट्रवादीला आवाहन
पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे ८२ तर शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भाजपने शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले होते. यावेळी दोन्ही पक्ष वेगळे झाले असल्याने भाजपने महापौर पदासाठी उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्र्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाने मदत करावी, असे आवाहन महापालिकेत झालेल्या एका बैठकीत भाजपकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - सत्तेच्या तीन अंकी नाटकात आम्ही यशस्वी होऊ, शेलारांच्या टीकेवर थोरातांचा पलटवार
नव्या सत्ता समीकरणामुळे शिवसेना प्रबळ दावेदार
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेनेचे ९४, भाजपचे ८३, काँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ८, समाजवादी पक्षाचे ६, एमआयएमचे २, मनसे १ असे २२३ नगरसेवक आहेत. तर चार जणांचे जात पडताळणीमुळे नगरसेवक पद रद्द झाले आहे. महापालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला जास्त मते मिळतात तो उमेदवार महापौर बनतो. भाजपने केलेल्या मागणीप्रमाणे जर काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने मदत केली तर मुंबई महापालिकेत वेगळे चित्र दिसू शकते. शिवसेना, भाजप, काँग्रेस यांनी वेगवेगळा उमेदवार दिल्यास सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचा महापौर बसेल. तसेच राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या सत्ता स्थापनेसाठी बैठका सुरू आहेत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकत्र आले तरी शिवसेनेचा महापौर यावेळी होईल.
महापौर आमचाच - विशाखा राऊत
मुंबई महापालिकेत शिवसेना हा मोठा पक्ष आहे. आमच्याकडे ९४ नगरसेवक आहेत. त्यामुळे आमचाच महापौर होणार, असा दावा पालिकेतील शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला आहे. भाजपने इतर पक्षाच्या मदतीने उमेदवार उभा करण्याबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा - राज्यात भाजपचेच सरकार, मुख्यमंत्री आमचाच - चंद्रकांत पाटील
पक्षश्रेष्ठी सांगतील ते करू - रवी राजा
मागच्या वेळी आम्ही महापौर पदासाठी उमेदवार दिला होता. उपमहापौर पदासाठी आमचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला होता. या निवडणुकीत आमचा पक्ष आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जो काही निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.