मुंबई : राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली, अशा चर्चा रंगू लागल्या. काही जणांनी यासाठी भाजपाला, तर काहींनी राष्ट्रवादीला जबाबदार धरले. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी ( Former Minister Aaditya Thackeray ) यावर भाष्य केले आहे. शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे, असे विधान आदित्य ठाकरे यांनी केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला - एका खाजगी कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवरून गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांवर अंधविश्वास ठेवला. आम्ही त्यांना आमचे समजत होतो. गेल्या ४० ते ५० वर्षात मुख्यमंत्र्यांकडे राहिलेले नगरविकास खाते, आम्ही त्यांना देऊ केले होते, असे सांगत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल ( Aaditya Thackeray attacked Eknath Shinde ) केला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे - या प्रसंगी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला वाटले नव्हते ते पाठीमागून वार करतील. सत्तेत असताना विरोधी पक्षातील नेत्यांना तडीपारीच्या नोटीसा दिल्या नाहीत. अथवा त्यांच्यावर पाळत ठेवली नाही. मात्र, आमच्या आमदारांवर पाळत ठेवली नाही, ही आमची चूक होती. राजकारण ही घाणेरडी जागा नाही, असेही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.