मुंबई: राज्यात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून ठाकरे सरकारमधील नेत्यांवर धाडी टाकण्याचे काम करत आहे, असा आरोप ठाकरे सरकारमधील नेते करत आहेत. अशातच राज्य विधिमंडळाचे अर्भसंकल्पिय अधिवेशन सुरू असताना विधान परिषदेत आमदार डॉ परिणय फूके यांनी भंडारा जिल्ह्यात धान खरेदीत मोठा घोटाळा झाला असून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.
काय आहे प्रकरण!
भंडारा जिल्ह्यातील करडी येथील जय किसान बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या बोरी येथील धान खरेदी केंद्रात वजन मापात प्रचंड तफावत येत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी भंडारा, पणन अधिकारी, तहसीलदार व कर्जत पोलिस ठाण्याकडे जानेवारी २०२२ रोजी केली होती. धानाची चोरी व शेतकऱ्यांची फसवणूक करणारे करडी येथील धान खरेदी केंद्र काळया यादीत टाकून कायमचे बंद करून केंद्राच्या संचालकावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जय किसान बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या केंद्राच्या धान खरेदी परवाना रद्द करण्यात आला असून खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे असे सांगितले. तसेच वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ चे कलम २४(१) व ३० (सी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे असेही सांगितले.
समाधान न झाल्याने सीबीआय ची मागणी!
मंत्री विश्वजीत कदम यांनी दिलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी मागणी सभापतींकडे केली. त्यावर बोलताना सभापतींनी सीबीआयकडे आता काय काय म्हणून देणार? (What will be given to CBI) असे सांगत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अप्रत्यक्षपणे टोमणा लगावला.