मुंबई - महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. मात्र या निवडणुका 2022 मध्ये झाल्या पाहिजेत की पुढे ढकलल्या पाहिजेत. याबाबत मुंबईकरांना काय वाटतेय, मुंबईकरांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत' चा हा विशेष रिपोर्ट...
मुंबई महानगर पालिकेचा कार्यकाळ पुढील वर्षी ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुक घेणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील पार पडली. निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे निर्देश, राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला दिले आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मात्र मुंबईकरांनी या निर्णयाला संमिश्र प्रतिसाद दिला आहे. काहींचे म्हणणे आहे की निवडणूक या वेळेवर झाल्या पाहिजेत, तर काहींचे म्हणणे आहे या निवडणुका घेतल्या तर बंगाल सारखी परिस्थिती येथे उद्भवू शकते. कोरोना संकटाशी सामना करणे जास्त गरजेचे आहे. असे काही मुंबईकरांचे म्हणणे आहे.
निवडणूक घ्यायला काही हरकत नाही -
मुंबई महानगरपालिका निवडणूक घेण्यासाठी सक्षम आहे. निवडणुका होण्यासाठी अजूनही 8 ते 9 महिन्यांचा अवधी आहे. तिथपर्यत सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे. लोकांना वाटते की निवडणुका होऊ नये मात्र निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांना मात्र निवडणुका घ्यायचे आहेत. कोरोनाची दुसरी लाट असताना बंगालच्या निवडणुका झाल्यात मग मुंबई महानगरपालिकाच्या का नाही असे जेष्ठ नागरिक ज्ञानदेव ससाणे यांनी सांगितले.
शंभर टक्के लसीकरण करा मग निवडणूक घ्या -
कोरोनाला जर संपवायचा असेल जास्त लसीकरण हाच एक मार्ग आहे. जर नोव्हेंबर पर्यंत मुंबईचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले तर निवडणुक घ्यायला काही हरकत नाही. ज्या प्रकारे सध्या लसीकरण सुरू आहे जर जास्त लस ही मुंबई महानगरपालिकेला मिळाली तर लसीकरण पूर्ण होईल अशी आशा आहे. जर निवडणुका घ्यायचे असतील तर पहिला प्रत्येक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करा असे ऍड संजय रणपिसे यांनी सांगितले.
मुंबईकरांना वेठीस धरू नका ?
बंगाल मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्याबरोबर न्यायालयाने देखील निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. यामुळे या सर्व बाबींचा विचार करूनच निवडणूका घ्यायचा की नाही हे ठरवा मुंबईकरांना वेठीस धरू नका असे विजय थोरात यांनी सांगितले.
निवडणुका पुढे ढकला तरुणांची मागणी -
गेले दीड वर्ष मुंबई कोरोनाशी लढत आहे. आरोग्य यंत्रणेने वरती ताण वाढलेला आहे. त्यामुळे निवडणुका झाल्या पाहिजेत मात्र सध्याची परिस्थिती पाहता निवडणुका पुढे ढकला अशी मागणी सुमित हेळेकर आणि विनोद मोहिते या तरुणांनी केली आहे.
कधी संपणार पालिकेची मुदत?
मुंबई महानगर पालिकेचा कार्यकाळ पुढील वर्षी ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुका घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात नुकतीच मुंबई महानगर पालिकेने निवडणुकांची पूर्वतयारी सुरू करण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाकडे मागितली होती. तसे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून पालिकेला देण्यात आले आहेत. या तयारीमध्ये मतदान केंद्र, मुंबईतील प्रभागांची पुनर्रचना, आरक्षणाच्या आधारावर वॉर्डची रचना मतदार याद्या अद्ययावत करणे अशा कामांचा समावेश आहे.
मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
- शिवसेना – 97
- भाजप – 83
- काँग्रेस – 29
- राष्ट्रवादी – 8
- समाजवादी पक्ष – 6
- मनसे – 1
- एमआयएम – 1
- अभासे – 1
हेही वाचा - मुंबई महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस स्वबळावर लढवणार