मुंबई - गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर सर्व व्यवसायांना दोन-तीन महिने दिलासा मिळाला होता. मात्र, आता लग्नसराईच्या दिवसातच पुन्हा लॉकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे लग्नसमारंभांवर कडक निर्बंध लागले आहेत. मंडप डेकोरेटरर्स, हॉल चालक, केटरिंगवाल्यांचा व्यवसाय पुन्हा संकटात सापडले आहेत.
गेल्या वर्षीचा लग्नाचा हंगाम कोरोनाच्या महामारीमुळे वाया गेला होता. लॉकडाऊननंतर अनेकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केला. तर, कित्येक हॉलचालकांनी हॉल वर्षभरासाठी भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. त्यातच कोरोनाचे संकट पुन्हा उभे ठाकल्याने त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. या व्यवसायाशी निगडित इतर व्यवसायिकही देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सगळ्याच गोष्टींचे झाले नुकसान -
लग्नसमारंभावर आलेल्या बंधनांचा फटका हॉलवाल्यांनाही बसला आहे. आम्हाला ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नासाठी हॉल देणे परवडत नाही. आता तर फक्त २५ लोकांचे बंधन घालण्यात आले आहे. लोकांची उपस्थिती वाढल्यास आमच्यावर दंडात्मक कारवाई होत असल्याने आम्ही हॉल भाड्याने देणे टाळत आहोत. ज्यांना तारखा दिल्या आहेत, ते देखील बुकींग रद्द करीत आहेत. त्यामुळे हॉलचे भाडे, खर्च, लाईटबिल, कामगारांचा पगार, कर्जाचे हप्ते, घरखर्च कसा करायचा याची चिंता असल्याचे व्यावसायिक म्हणतात.
या सिझनवर फिरले पाणी -
दिवाळीनंतर कोरोनाचे रूग्ण कमी झाल्याने लग्नसराईत थोडेफार उभे राहता येईल, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण वाढू लागले. ऐन लग्नसराईतच लग्न समारंभावर अनेक निर्बंध आले आहेत. त्याचा फटका मंडप डेकोरेटर, साउंड सिस्टिमवाले, सोनार, कपड्याचे दुकानदार, जेवण, मिठाईवाले, बँडवाले, बँजोवाले, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर, पाणीवाले, हार, फुले, विकणारे, आणि मद्यविक्रेतांसह लग्नसराईवर अवलंबून असलेल्या विविध व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. कोरोनाने यंदाच्या लग्नसराईवर देखील पाणी फिरवले आहे. कित्येक लोकांनी पोलिसांची परवानगी घेऊन पाच-पन्नास माणसांना बोलवून घरच्या घरी ठरलेली लग्ने उकरून टाकली आहेत.
हेही वाचा - अंत्यसंस्कारांसाठी चोवीस तास अविरत राबणारे हाथ.. येथे कर माझे जुळती!!