मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे लादलेल्या लॉकडाऊन काळात अनेक कलावंतांना अडचणीला सामोरे जावे लागले. आपल्या लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यशासन सकारात्मक असून लोककलावंतांना उपाशी मरू दिले जाणार नाही, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज(बुधवार) दिली.
आज मंत्रालयात आमदार अतुल बेनके, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक कलावंत विकास महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेते सुशांत शेलार यांच्यासह लोककलावंत मालती इनामदार, राजू बागुल,शांताबाई संक्रापूर, राजू गायकवाड, शफी भाई शेख आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले की, राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यातील कलाकरांना उभारी देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असून लोकनाटय सादर करणाऱ्या कलाकारांनी मांडलेल्या विविध अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून कोविड-19 मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन कालावधीत कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने लोककलावंतांचे नुकसान होत आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा लोककलावंताना लोककला सादर करण्याची परवानगी मिळावी, संगीतबारी आणि तमाशा असे वेगवेगळे प्रकार करण्यात यावेत,शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, लोककलावंत यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, लोककलावंतासाठी कल्याणकारी मंडळ असावे, कलावंतांना मिळणारे अनुदान वेळेत मिळावे, लोककलावंतासाठी विमा योजना आणि आरोग्य योजना असाव्यात अशा काही मागण्यांचे निवेदन यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांना देण्यात आले.