मुंबई - मेट्रोसाठी आरेमधील झाडे तोडण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले म्हणून वृक्ष प्राधिकरण समितीमधील सदस्यांना स्थायी समिती अध्यक्षांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नागरसवेक कप्तान मलिक यांनी केला आहे. मात्र, या आरोपाचे खंडन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केले आहे. आम्ही कोणाला धमक्या दिल्या नाहीत. आम्ही फक्त लोकशाही पद्धतीने निषेध नोंदवला, असे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
मेट्रोसाठी गोरेगाव आरेमधील २ हजार ७०० वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर करताना काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सभात्याग केला होता. राष्ट्रवादीचे नगरसेवक कप्तान मलिक, तीन वृक्ष तज्ञ् आणि भाजपच्या 5 सदस्यांनी वृक्ष तोडण्याच्या बाजूने मतदान केले होते. यामुळे, हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
हेही वाचा - आरे वृक्षतोड प्रकरणी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांना शिवसेनेकडून धमक्या
आज वृक्ष प्राधिकरण समितीत याचे पडसाद उमटले. सभा सुरु झाल्यावर कप्तान मलिक यांना चोर आणि दलाल अशी उपमा देत शिवसेनेकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावरून कप्तान मलिक आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन कप्तान मलिक यांनी आपल्याला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडून धमक्या देण्यात आल्याचा आरोप केला आहे. आरेसाठी २ हजार ७०० झाडे तोडण्याला विरोध करणारी शिवसेना १९९५ साली आरेमध्ये हजारो झाडे तोडून रॉयल पाल्म प्रकल्प राबवला गेला तेव्हा गप्प का राहिली, असा प्रश्नही कप्तान मलिक यांनी उपस्थित केला.