मुंबई - कोरोना नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयालाही तौक्ते वादळाचा फटका बसला आहे. सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नायरचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळाने उडवली मुंबईची दैना, परिस्थिती सुधारण्यास अवधी लागेल - आदित्य ठाकरे
रुग्णालयातील दोन्ही प्रवेशद्वार पाण्याखाली गेल्याने रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. तर, रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड ओपीडीत आणि लसीकरण केंद्रात पाणी साचले आहे. तेव्हा ओपीडी बंद आहे, पण जे रुग्ण नायरमध्ये येत आहेत, त्यांची तपासणी, चाचणी आणि उपचार केले जात आहेत. रुग्णसेवेवर याचा कोणताही परिणाम होऊ दिला जात नसल्याची माहिती डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली.
हे नेहमीचं झालेय?
नायर रुग्णालय सखल भागात आहे. त्यामुळे, मुंबईत मोठा पाऊस झाला की नायर रुग्णालय पाण्याखाली जातेच. दरवर्षी पावसाळ्यात नायर रुग्णालयात पाणी साचते. पण, गेल्या वर्षभरापासून नायर रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे. मोठ्या संख्येने येथे रुग्ण दाखल केले जात आहेत. अशावेळी पावसात नायर रुग्णालय पाण्याखाली जात असल्याने त्याचा फटका रुग्णांसह रुग्णालयाला बसतो. मागील वर्षी निसर्ग वादळातही या रुग्णालयात पाणी साचले होते, त्यामुळे रुग्ण आणि कर्मचारी याला कंटाळले असून यावर काही तरी उपाययोजना होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
लसीकरण उद्याही बंद?
नायर रुग्णालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर आणि आत परिसरात पाणी साचले आहे. तर, याच प्रवेशद्वारालगत असलेले कोविड ओपीडी आणि लसीकरण केंद्र पाण्याखाली गेले आहे. कोविड ओपीडी तात्पुरती इतरत्र हलवण्यात येणार आहे. पण, लसीकरण केंद्र पाण्याखाली असून उद्यापर्यंत पाणी ओसरले तरी तत्काळ केंद्र सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे, हे केंद्र पुढचे एक-दोन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. पण, डॉ. भारमल यांनी मात्र उद्या सकाळी परिस्थितीचा आढावा घेत केंद्र उद्या वा परवा सुरू करू असे सांगितले आहे. दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन दिवसांपासून मुंबईतले सर्वच लसीकरण केंद्र बंद आहेत.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील छत उडाले