मुंबई : कुर्ला खैरानी रोड येथे तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदिर मार्ग या विभागात जलवाहिनी सक्षमीकरण व मजबुतीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी उद्यापासून ४ मार्च ते ६ मे दरम्यान कुर्ला परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे असे आवाहन पालिकेच्या जल विभागाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांसाठी टप्प्याटप्प्याने काम : कुर्ला एल विभाग येथील खैरानी रोडखाली असणा-या आणि तुकाराम पूल ते जंगलेश्वर महादेव मंदीर या दरम्यानच्या जल वाहिनीच्या सक्षमीकरण व मजबुतीकरणाचे काम सलग १० दिवस करावे लागणार आहे. हे काम सलग केल्यास नागरिकांची गैरसोय होऊ शकते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिकेच्या जल विभागाने हे काम टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. ४ मार्च ते ६ मे दरम्यान दर शुक्रवार आणि शनिवारी हे काम केले जाणार आहे.
या विभागात पाणी बंद : ४ मार्चपासून दर शुक्रवार शनिवार असे दोन दिवस काम केले जाणार असल्याने कुर्ला येथील संघर्ष नगर, लॉयलका कंपाऊंड, सुभाष नगर, भानुशाली वाडी, यादव नगर, दुर्गामाता मंदीर, कुलकर्णी वाडी, डिसुजा कंपाऊंड, लक्ष्मी नारायण मार्ग, जोश नगर, आजाद मार्केट या परिसरात १० शनिवार पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यासाठी दर शुक्रवारी पाण्याचा पुरेसासाठा करून ठेवावा. तसेच पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे असे आवाहन जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.
पाणी गाळून, उकळून वापरा : १० शुक्रवार शनिवार जल वाहिनेचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शनिवारी पाणीपुरवठा बंद असणार आहे. नागरिकांना रविवारी पाणीपुरवठा केला जाणार आहे. हा पाणीपुरवठा जल वाहिनीचे तांत्रिक काम झाल्यानंतर होणार असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळूनच वापरावे, असेही आवाहन पालिकेने केले आहे.
या तारखांना पाणी पुरवठा बंद : ४ मार्च २०२३, ११ मार्च २०२३, १८ मार्च २०२३, २५ मार्च २०२३, १ एप्रिल २०२३, ८ एप्रिल २०२३, १५ एप्रिल २०२३, २२ एप्रिल २०२३, २९ एप्रिल २०२३ आणि ६ मे २०२३ या दिवशी पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल अशी माहिती पालिकेच्या जल विभागाने दिली आहे. नागरिकांनी च्याची दखल घेऊन तात्काळ दखल घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.