मुंबई: पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून ट्रॉम्बे जलाशय येथे दुरुस्तीचे काम ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ट्रॉम्बे उच्च स्तरीय जलाशयातील इनलेट व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे या २४ तासात पालिकेच्या एम पूर्व आणि एम पश्चिम या दोन विभाग कार्यालयाच्या हद्दीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत या विभागातील नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करावा तसेच या कालावधीत पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
याठिकाणी पाणी बंद :
एम/पूर्व विभाग : टाटानगर, गोवंडी स्टेशन मार्ग, देवनार म्युनिसिपल वसाहत (कॉलनी), गोवंडी, लल्लूभाई इमारत, जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार गाव रस्ता, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गाव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव, गोवंडी स्टेशन रोड, सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा चिता कॅम्प ट्रॉम्बे, देवनार फार्म रोड, बोरबादेवी नगर, बी.ए.आर.सी. फॅक्टरी, बी.ए.आर.सी. वसाहत (कॉलनी), गौतम नगर, पांजरापोळ
एम/पश्चिम विभाग : घाटला अमर नगर, मोती बाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत (कॉलनी), लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लाल वाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर
मुंबईकरांचे २४ तास पाण्याचे स्वप्न अपुरेच : मुंबईमधील सुमारे दीड कोटी नागरिकांना २४ तास पाणी मिळेल अशी स्वप्न दाखवण्यात आली होती. महापालिकेकडून २ विभाग कार्यालयाच्या हद्दीत प्रायोगिक तत्वावर तसा प्रयोग करण्यात आला. मात्र २४ तास पाण्यासाठी पाणीसाठा अपुरा असल्याने मुंबईकरांचे हे स्वप्नच राहिले आहे. पुढील आणखी काही वर्षे महापालिकेकडून नवीन प्रकल्प हाती घेतेले जातील, याची शक्यता नसल्याने मुंबईकरांचे २४ तास पाण्याचे स्वप्न अपुरेच राहणार आहे.
सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनाचा फज्जा : २४ तास पाण्याचा प्रयोग अयशस्वी मुंबईमध्ये १ कोटी ३० लाख नागरिक राहतात. मुंबई बाहेरून कामानिमित्त लाखो लोक येतात. या सर्वांची तहान भागवण्याचे काम मुंबई महापालिकेकडून केले जाते. पालिकेकडून दिवसाला ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा भातसा, मोडक सागर, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, तुळसी, विहार आदी धरणांमधून केला जातो. नागरिकांना पुरेल इतका हा पाणीसाठा जेमतेम आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईकर नागरिकांना २४ तास पाणी देऊ असे आश्वासन पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने दिले होते. त्यासाठी पालिकेच्या २४ विभागापैकी वांद्रे येथील एच वेस्ट आणि मुलुंड येथील टी विभागाची निवड करण्यात आली. मात्र या दोन्ही विभागात हा प्रयोग यशस्वी झालेला नाही.
हेही वाचा : Kasba Bypoll : ...तरच भाजप आपला उमेदवार मागे घेईल; चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान