मुंबई - 'आमदार निलेश लंके यांनी संकटाच्या काळात दुःख वाटून घेतले आहे. माणुसकीचं नातं कसं जपावं हे त्यांनी दाखवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभतात. जेव्हा जेव्हा संकट येतं, तेव्हा पवारसाहेब सामान्यांसाठी धावून जातात. त्याचप्रमाणे निलेश लंके काम करत आहेत', अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले आहे.
पारनेर तालुक्याच्या भावळणी येथे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर कोविड सेंटर उभारले आहे. तेथेच ते कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यामुळे निलेश लंके भावूक
दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या बैठकीदरम्यान आमदार निलेश लंके यांनी जयंत पाटलांना कोविड सेंटरला भेट देण्याची विनंती केली होती. निलेश लंके यांच्या विनंतीला मान देत अवघ्या दोन दिवसात जयंत पाटील पारनेरमध्ये दाखल झाले. यामुळे निलेश लंके भावूक झाले होते.
'निलेश लंकेंनी महाराष्ट्राचे नाव उंचावले'
'काही दिवसांपासून फक्त ऐकूनच होतो. मात्र, आज (23 मे) या कोविड सेंटरला भेट दिल्याने आमदार निलेश लंके यांचा अभिमान वाटत आहे. सर्वांची सेवा करण्याचा 'वसा' त्यांनी घेतला आहे. १४ एप्रिलपासून झोकून काम करत आहेत. लोकांचा आदर्श म्हणून ते उभे राहिले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. सामान्य माणसाची चांगली सेवा आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून होत आहे', असं म्हणत जयंत पाटलांनी निलेश लंकेंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
हेही वाचा - प्रियंका गांधींची फेसबुक पोस्ट.. जहाज वादळात सोडून पळून जाणाऱ्या कॅप्टनची तुलना पंतप्रधानांशी