मुंबई - केंद्र सरकारने देशात 20 लाख कोटींचे पॅकेज देण्याची घोषणा केलेली असताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्याकडे पॅकेज मागत आहेत. त्यांना केंद्राच्या पॅकेजवर विश्वास नाही का?, असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज्यातील विविध घटकांसाठी राज्यानेही पॅकेज देण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. त्यावर पाटील यांनी पाहिल्यांदाच जाहीर भाष्य केले. पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना ते बोलत होते.
विरोधकांनी संयमाने राज्यातील स्तिथीचा आढावा घेऊन सरकारसोबत या संकट काळात उतरले पाहिजे. मात्र, विरोधक याचेही राजकारण करत असल्याचे पाटील म्हणाले. वारंवार राज्यपालांना भेटून तक्रारी करण्यापेक्षा विरोधकांनी सरकारशी संवाद ठेवायला हवा असेही त्यांनी सांगितले. दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना आमची विनंती आहे की, आमच्याशी बोला, आम्हाला व्यवस्था आणखी सुधारायला सूचना द्या. सतत राज्यपालांना भेटून त्रास देणे योग्य नाही. अशाप्रकारे व्यवस्थेचे खच्चीकरण करणे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.
देशात आर्थिक व्यवस्था संकटात आहे. याकाळात पॅकेज देणार असल्याचे सांगितले जाते. राज्याचा जीएसटीचा परतावा तरी केंद्राने द्यावा. मुंबई आणि पुण्यासारखी शहरे आज ठप्प पडली आहेत. या शहराचा 4500 कोटी रुपयांचा परतावा देखील केंद्राने अद्याप दिलेला नाही. केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या 20 लाख कोटींमध्ये अर्थसंकल्पातील हिस्सा मोठा असल्याने नेमकी वेगळी अशी काय मदत होणार? हे ही अद्याप स्पष्ट व्हायचे आहे, असेही पाटील म्हणाले.
विरोधी पक्ष नेते राज्याच्या हितासंदर्भात बोलत असतील, तर त्यांनी यापुढे मुख्यमंत्र्यांना भेटून काही आवश्यक सल्ले द्यावेत. कदाचित त्यामुळे केंद्राकडे थकीत असलेला राज्यसरकाराचा परतावा मिळण्यास मदत होईल, असा टोलाही पाटील यांनी फडणवीस यांना लगावला.