मुंबई - जलसंधारण विभागाचे कर्मचारी आता दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतची ही पहिली शिफ्ट असणार आहे, तर दुसरी शिफ्ट दुपारी 12 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत असणार आहे. मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख लवकरच या संबंधीचा निर्णय घेणार आहेत.
मुख्यंमत्र्यांनी व्यक्त केले होते मत -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता कामाच्या वेळेचे नियोजन नव्याने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. केवळ शासकीय नाही, तर खाजगी कार्यालयाच्या वेळादेखील बदलण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. सर्व कार्यालयाच्या वेळा या जवळपास सारख्याच असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात कर्मचारीवर्ग घराच्या बाहेर पडतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे कामाच्या नियोजित वेळांत बदल करणे गरजेचे असल्याचे मत मुख्यंमत्र्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मृद आणि जलसंधारण विभागाचे कर्मचारी दोन शिफ्ट काम सुरू करणार आहेत. मृद व जलसंधारण विभागाकडून असा निर्णय घेतल्यानंतर इतरही विभागाकडून कार्यालयीन वेळेचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे.