मुंबई Sea link Project : मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं वर्सोवा ते विरार (Versova Virar) हा सीलिंक प्रकल्प राबविण्यात येत आहे. वर्सोवात विरार सीलिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. त्यांचा प्रवास आरामदायी आणि वेगवान होणार आहे. मात्र, आता या सीलिंकचा विस्तार करण्याचं ठरवलं असून विरार ते पालघर पर्यंत हा विस्तार केला जाणार आहे. एमएमआरडीने वरळी ते वांद्रे, वांद्रे ते वर्सोवा आणि वर्सोवा ते विरार हा तीन टप्प्यातला सीलिंक प्रकल्प हाती घेतला असतानाच, आता या प्रकल्पाचा विस्तार पालघर पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
निविदा प्रक्रियेला सुरुवात : विरार ते पालघर या नव्या सीलिंक प्रकल्पासाठी एमएमआरडीएने नुकतीच निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या प्रकल्पाचा खर्च त्यामुळे आता तीस हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्प हे एमएमआरडीएच्या माध्यमातून राबवले जातात. त्यामुळे या सीलिंकची जबाबदारी सुद्धा एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे.
काय आहे प्रकल्प? : सध्या वांद्रे ते वर्सोवा हा 17 किलोमीटर चा सीलिंक मार्ग तयार होत आहे. मात्र, आता वर्सोवा ते विरार असलेला प्रकल्प थेट पालघरपर्यंत वाढवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यामुळे आता या नव्या मार्गीकेची एकूण लांबी 43 किलोमीटर असणार आहे. वर्सोवा ते विरार हा 31 हजार 426 कोटींचा असलेला प्रकल्प आता या नव्या निविदा प्रक्रियेनुसार, 63 हजार 424 कोटींवर पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे आता नरिमन पॉईंट ते विरार दरम्यानच्या प्रवासाचा वेळ, तीन तासांवरून एक तासांपर्यंत कमी होणार आहे. तर पालघर ते विरार या प्रवासाचा वेळही निम्म्यावर येणार आहे.
हेही वाचा -