मुंबई - 10 ते 12 वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्प हाती घेतला खरा, पण या प्रकल्पाची एक वीटही रचली गेली नाही. एकाअर्थाने हा प्रकल्प बासनातच गुंडाळून ठेवला होता. मात्र आता हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प नुकताच एमएमआरडीएकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीए) च्या पदरात पडला आहे. रखडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने कंबर कसली आहे. त्यानुसार लवकरच नियोजन केले जाणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगितले जात आहे.
वेगाने वाढणाऱ्या विरार आणि अलिबाग या दोन महत्त्वाच्या शहरांना एकमेकांशी थेट जोडत त्यांच्यातील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्प हाती घेतला होता. 128 किमीचा हा मार्ग विरार-अलिबाग दरम्यान असलेल्या गावांच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. त्यामुळे हा प्रकल्प कधी सुरू होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. पण 10 ते 12 वर्षाचा काळ गेला तरी हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिला. आता हा प्रकल्प कधीच होणार नाही, असे वाटत असतानाच एमएसआरडीएने प्रकल्प मार्गी लावण्याचे ठरवले आहे.
एमएमआरडीएने मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्प एमएसआरडीसीला दिला आहे तर त्यामोबदल्यात एमएसआरडीसीचा ठाणे ट्वीन टनेल प्रकल्प एमएमआरडीएला देण्यात आला आहे. ही हस्तांतरणाची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता एमएसआरडीए मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कामाला लागला आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठीचे नियोजन केले जात असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. हा रखडलेला प्रकल्प शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, एमएसआरडीसीकडून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग बांधला जात आहे. या प्रकल्पाला मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रकल्प जोडला जाणार आहे. जेएनपीटी येथे हे दोन्ही मार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात जेएनपीटीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न ही मार्गी लागणार आहे.