मुंबई - बुधवारी भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्येही पक्षाच्या ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांची नावे जाहीर झालेली नाहीत. दुसऱ्या यादीतही भाजपचे नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विनोद तावडे हे बोरिवली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांचेदेखील नाव या दुसऱ्या यादीत आलेले नाही. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांची भाजप दुसऱ्या यादीतही परीक्षा घेत असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा - भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल
याशिवाय दुसऱ्या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, मुंबादेवीचे विद्यमान आमदार राज पुरोहित, एसआरए घोटाळ्यात नाव आलेले माजी मंत्री प्रकाश मेहता, माजी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनाही दुसऱ्या यादीत डावलण्यात आले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 125 उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. त्यानंतर बुधवारी 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये पक्षाच्या या नेत्यांची नावे नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा 4 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असल्याने भाजप मध्यरात्रीपर्यंत अजून उमेदवारी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यात तरी या भाजप नेत्यांची नावे येतील की नाही ही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हे ही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : भाजपकडून पहिली यादी जाहीर; ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना वगळले