मुंबई- आषाढी एकादशी निमित्ताने प्रतिपंढरपूर अशी ओळख असणाऱ्या वडाळा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची पहाटे विधिवत महाअभिषेक व पूजा केली. व महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेला सुखी ठेव आणि निरोगी ठेव अशी प्रार्थना विठ्ठलाच्या चरणी केली. काही राजकीय नेते व अभिनेत्यांना पंढरपुरात काही कारणास्तव जायला जमत नाही, ते मुंबईच्या वडाळा विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येतात.
वडाळा येथील हे मंदिर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. पंढरपूरपर्यंत न पोहोचलेले भक्त आषाढी एकादशीच्या आदल्या रात्रीपासूनच इथे रांगेमध्ये उभे असतात. मंदिर रात्रभर खुले असल्याने अनेक भक्तांना दर्शन घेऊन नोकरीसाठीही वेळेत जाता येते. गुरुवारी रात्रीपासूनच भाविकांनी विठ्ठलदर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शुक्रवारी विठ्ठल मंदिरामध्ये शिक्षण मंत्र्यांनी पूजा करत राजकारण बाजूला ठेऊन दर्शने घेतले. आणि आयुष्यात चांगले काम व्हावे व सर्वांनी सुखी राहावे यासाठी देवाजवळ प्रार्थना केली.