मुंबई - सर्वत्र 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करतात त्यांना ही तारीख मान्य नाही. शिवजयंतीची १९ फेब्रुवारी तारीख मान्य नसल्यास मुख्यमंत्र्यांना गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांची दुटप्पी भूमिका या महाराष्ट्रात चालू देणार नाही, अशी टीका शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. शिवसंग्राम पक्षाच्या 18 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हे दुटप्पी सरकार पडले पाहिजे आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याला काम करायचे आहे. सरकारला सत्तेत येऊन तीन महिने झाले, तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत दहा मिनिटे बोलायला महाविकास आघाडी सरकारला वेळ मिळाला नाही. मराठा आरक्षणाच्या कागदपत्रांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले नाही म्हणून सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही. एकीकडे आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे त्याकडे लक्षही द्यायचे नाही, असा प्रकार या सरकारने चालवला असल्याचे मेटे म्हणाले.
हेही वाचा - 'मैदान सोडून पळणारा मी नाही; सरकार येत नाही तोपर्यत कुठेही जाणार नाही'
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी दोन लाखांची घोषणा केली. त्याची पूर्तता अजूनही झालेली नाही. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी यापुढे आम्ही भाजप सोबत राहणार आहोत, असे मेटे यांनी सांगितले.