मुंबई - नुकतीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची बैठक संपलेली आहे. यामध्ये सर्वसमावेशक कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. तसेच या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच यामधील चर्चेचा तपशील हायकमांडला पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकार स्थापन करण्यापेक्षा ते चालणार कसे? यावर चर्चा करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व बाबींवर चर्चा केली असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. आता लवकरात लवकर महाराष्ट्रात सत्ता स्थापन व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची गरज आहे. वरिष्ठ नेत्यांनी या मसुद्याला हिरवा कंदील दिल्यास लवकरच सरकार स्थापन होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
काँग्रेस मुख्यमंत्रीपदावर दावा करणार आहे का? असे विचारल्यानंतर ते म्हणाले, आम्हाला कुठलेही मुख्यमंत्रीपद नको. त्याबद्दल आम्ही आणि आमच्या हायकमांडनी देखील विचार केला नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.