मुंबई - राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात फसवण्याचा उद्योग करून जनतेची दिशाभूल केली. आता जाहिरातबाजीतही त्यांनी खोटारडेपणाची सीमा ओलांडली आहे. आरोग्य विभागाच्या जाहिरातीत दिलेली माहिती सपशेल खोटी आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा- धक्कादायक.. गोवंडीत विद्यार्थ्याने शिक्षकेची भोसकून केली हत्या
सरकारी जाहिरातबाजीचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले, की सरकारची पाच वर्षातील कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची झाली आहे. कोणताही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. असे असताना 'सर्वोत्तम कामगिरी, महाराष्ट्र मानकरी', या जाहिरातीतून आपल्या अपयशावर पांघरून घालण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे. परंतु, या जाहिरातबाजीतील दावाही खोटा निघाला आहे. आरोग्य विभागाच्या पानभर जाहिरातीमध्ये बाईक ऍम्ब्युलन्स सेवेमुळे 'आरोग्यदायी झेप' घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा करताना दिलेली आकडेवारी वस्तुस्थितीला धरून नाही. ऑगस्ट २०१७ ला मुंबईत १० बाईक ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर मेळघाट, पालघर, गडचिरोली या दुर्गम भागातही सेवेचा विस्तार करण्यात आला. पण सरकारचा कालावधी संपत आला तरीही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचेच सांगितले जात आहे. पालघर, मेळघाटमध्ये १० बाईक्सच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली सेवा तर वर्षभरातच कर्मचारी वर्ग नसल्यामुळे बंद करण्याची नामुष्की ओढवली असल्याची माहिती आहे. परंतु आरोग्य विभागाला त्याचा पत्ताच नाही.
हेही वाचा- चार आठवड्यात फूड कमिशनची स्थापना न केल्यास मुख्य सचिवांवर कारवाई - उच्च न्यायालय
२०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये ३३ लाख रुग्णांना या बाईक ऍम्ब्युलन्स सेवेचा लाभ झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात ३० बाईक ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून ३३ लाख रुग्णांना फायदा, हा दावाच हास्यास्पद आहे. त्यातही ही सेवा ऑगस्ट २०१७ पासून सुरू झाली असताना २०१४ पासून सुरू झाली, हे कशाच्या आधारावर सांगितले आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाचे मंत्री शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतही खोटी माहिती देण्यात आलेली आहे. आरोग्यमंत्र्याचा विभागाच्या कामापेक्षा प्रसिद्धीकडे जास्त कल असावा, त्यामुळेच खोटी व कपोलकल्पित माहिती देऊन न केलेली कामगिरी केली, असे सांगण्यासाठी हा खटाटोप केलेला दिसतो आहे. सरकारचा उताविळ कारभार पाहता, 'आंधळं दळतंय अन् कुत्रं पिठ खातंय', अशी अवस्था असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.