मुंबई : मुंबईसह देशाला हादरून टाकणारा साखळी बॉम्बस्फोट 12 मार्च 1993 साली घडला होता. देशातील काळा दिवस समजल्या जाणाऱ्या 12 मार्चला अनेक निष्पाप जीवांच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या होत्या. 1993 बॉम्बस्फोटाला आता तीस वर्ष पूर्ण होत आहेत. या बॉम्बस्फोटात बालपणातच आपली आई गमावलेल्या तुषार प्रीती देशमुख यांनी अद्याप 1993 बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी आणि देशद्रोही असलेला कुख्यात गुंड दाऊद अजूनही मोकाटच असल्याची खंत ईटीव्ही भारतकडे व्यक्त केली आहे. तसेच दाऊदला फासावर लटकवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बॉम्बस्फोटात आईचा झाला होता मृत्यू : 1993 बॉम्बस्फोटात वरळी येथील सेंच्युरी बाजार जवळ बस स्टॉप येथे प्रीती देशमुख या कामावरून परतत असताना मृत पावल्या. 1993 च्या बॉम्बस्फोटात सेंच्युरी बाजारकडे झालेल्या स्फोटात तुषारच्या आईचा मृत्यू झाला. तेव्हा तुषार 10 वर्षांचा होता. आई गेल्याच्या दु:खातून सावरायला तुषार बराच काळ लोटला. त्यावेळी त्याला या आभाळापेक्षा भयाण अशा दुखातून सावरण्याचे बळ त्याचा शाळेतील मित्र योगेश म्हात्रे यांनी दिले होते.
साखळी बॉम्बस्फोटाला 30 वर्षे पूर्ण : 1993 मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाला आता तीस वर्ष पूर्ण होत आहेत. याबाबत ईटीव्ही भारतसोबत बोलताना तुषार देशमुख यांनी सांगितले की, 12 मार्च 1993 हा आपल्या जगातला सर्वात महत्त्वाचा काळा दिवस नोंदला गेला. ज्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट झाले. या दिवशी मला माझी आई सोडून गेली. या दुर्दैवी घटनेला तीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि दुर्दैवी गोष्ट अशी आहे की, हा देशद्रोह घडवणारा देशद्रोही कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम अजूनही मोकाट फिरत आहे. त्याच्यावरती कोणतीही कारवाई नाही. अजूनही त्याला पकडले गेलेले नाही आणि त्याला अजूनही फासावरती लटकवले गेले नाही. ही आमच्यासाठी वेदनादायक गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
दाऊदला फासावर लटकवा : पुढे तुषार देशमुख यांनी सांगितले की, संजय दत्त जो देशद्रोही होता जो आहे त्यालाही इनोसंट बॉय म्हणून ज्या पद्धतीने सोडवले. त्याच्याही वेदना आम्हाला अजूनही भोगावे लागतात. आमची मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना एकच विनंती आहे की, आजही तीस वर्ष पूर्ण झाली तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही. हा न्याय आम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि त्या देशद्रोही दाऊद इब्राहिमला मदत करणारे असे अनेक देशद्रोही जे आहेत त्यांना तुम्ही गजाआड नाही तर फासावरती लटकवाल आणि हीच आमची अपेक्षा आहे. तुमच्याकडून आणि ती तुम्ही पूर्ण कराल याची खात्री आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवून आहोत, अशी आशा तुषार देशमुख यांनी व्यक्त केली.
कोण आहे तुषार देशमुख? : तुषार प्रीती देशमुख याची आई आई प्रीती देशमुख 1993 ला मुंबईच्या पेडर रोडवर कॅन्टीन चालवत असे. बॉम्बस्फोटाच्या दिवशी बस पकडून घरी येत असताना बस वरळीच्या सेंच्युरी बाजार येथे झालेल्या बॉम्बस्फोटात आई गेल्याने तुषारने या विरोधात त्याने आवाज उठवायचे ठरवले. त्यानंतर विविध चॅनेल्स, वृत्तपत्राच्या माध्यमातून दाऊद आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्याने सातत्याने धरून ठेवली आणि आजही ती मागणी कायम आहे.