मुंबई - महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात एका साधूसह दोन जणांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"शिवसेनेला सोनिया सेना बनवू नका. उद्धव यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे." अशा शब्दांत बन्सल यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल केला. बन्सल म्हणाले, "राज्यात राज्यात साधू मारले जात आहेत हे दुर्दैवी आणि निराशाजनक आहे. पालघर मॉब-लिंचिंग प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाई केली असती तर ही घटना टाळता आली असती," असे बन्सल म्हणाले.
विनोद बन्सल पुढे म्हणाले, "पालघरमध्ये साधुंचा बळी जाऊन एक महिना झाला आहे. मात्र, त्यांचे हल्लेखोर मोकळेपणाने फिरत आहेत. भविष्यात असे हल्ले होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी मी राज्य सरकारला कठोर कारवाई करण्याची विनंती करतो", असेदेखील ते म्हणाले.
"माझ्या मते, अशी प्रकरणे सीबीआयकडे सोपवायला हवी. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या प्रकरणाचा तपास करण्यात आणि त्या साधुंना न्याय देण्यात अपयश ठरले तर तो बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारावर अन्याय असेल", असेही ते पुढे म्हणाले. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील आश्रमात राहणार्या साधुला रविवारी सकाळी जमावाने ठार मारले. त्यादिवशी पोलिसांनी तेलंगाणा सीमेवर आरोपीला पैसे आणि लॅपटॉपसह अटक केली आहे.