मुंबई - मुंबईत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत चालली असली तरी त्याबरोबरच दरवर्षी वाहनचोरी होण्याच्या घटनांमध्येसुद्धा वाढ होत असल्याची बाब माहिती अधिकाराखाली समोर आली आहे. गेल्या सहा वर्षात मुंबईत 536 कोटी रुपये किमतीच्या 19 हजार 907 वाहनांची चोरी झाल्याची माहिती यात उघड झाली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत चालली असली तरी त्याबरोबरच दरवर्षी वाहनचोरी होण्याच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होत चालल्याचे माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे.
गेल्या सहा वर्षांत 536 कोटी 65 लाख 77 हजार एवढ्या किमतीच्या वाहनांची चोरी झाली असून त्यामानाने चोरी झालेल्या वाहनांचा तपास पोलिसांकडून मात्र हवा तसा होत नसल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
मुंबईत जानेवारी 2013 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 19 हजार 907 वाहने चोरीला गेल्याचे गुन्हे मुंबईतल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले असून या वाहनांची किंमत जवळपास 536 कोटी रुपये ऐवढी आहे. मात्र, याबाबतीत स्थानिक पोलीस ठाण्यातून झालेला तपास व मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाकडून करण्यात आलेल्या वाहन चोरीच्या तपासात गेल्या सहा वर्षात केवळ 74 कोटी 60 लाख रुपयांची वाहने परत हस्तगत करण्यात आली आहेत. याचा अर्थ गेल्या सहा वर्षात चोरी झालेल्या एकूण वाहनांपैकी फक्त 27 टक्के वाहनांचा शोध लागला आहे.
वर्षाप्रमाणे मुंबईत झालेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद
- वर्ष 2013 - 3789 वाहनांची चोरी
- वर्ष 2014 - 3474 वाहनांची चोरी
- वर्ष 2015 - 3311 वाहनांची चोरी
- वर्ष 2016 - 3118 वाहनांची चोरी
- वर्ष 2017 - 3012 वाहनांची चोरी
- वर्ष 2018 - 3203 वाहनांची चोरी
पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर भारतात अजूनही वाहन चोरीचे प्रकार रोखण्यासाठी वाहनांमध्ये जीपीएसचा वापर हवा तसा केला जात नाही. मुंबईसारख्या शहरात एसयूव्ही व सीदान सारख्या गाड्यांच्या चोरीचे प्रमाण अधिक आहे.
वाहनचोरीच्या प्रकरणात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसारख्या राज्यातील आंतरराज्य टोळी मुंबईत येऊन वाहन चोरी करीत असल्याचे गेल्या काही प्रकरणात समोर आले आहे. मुंबईत चोरी झालेल्या गाड्यांचे नंबर प्लेट, चेसी नंबर व रंग काही तासातच बदलून नेपाळमार्गे बांगलादेशात विकल्या जात आहेत. मुंबईतल्या काही परिसरात चोरीच्या गाड्यांचे भाग काही मिनिटातच वेगळे करून विकले जात असल्याने, अशा टोळ्यांवर अंकुश ठेवून वाहनांचा तपास करणे मुंबई पोलिसांना कठीण जात आहे.