मुंबई - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील दहीसर पूर्व अशोकवन परिसरात असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांनी भरलेली एक गाडी आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून गाडी ताब्यात घेतली आहे.
गाडीत आढळले फटाक्याचे बॉक्स -
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अशोकवन येथील कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून टाटा सुमो ही गाडी पार्क करण्यात आली होती. परंतु, कार्यालयातील काही जणांना संशय आल्यानंतर त्यांनी या गाडीची पाहणी केली. त्यानंतर यात काही असल्याचे समजताच पोलिसांना त्वरित या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान, या गाडीत बॉक्समध्ये फटाके भरलेले असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, हा घातपाताचाही प्रकार असू शकतो, असा संशय प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला.
प्रकरणाची सर्व तपासणी करून कारवाई करू -
पोलिसांनी संबंधित गाडी ताब्यात घेतली असून संबंधित गाडीच्या मालकाची ओळख पटली आहे. तो जवळच्याच इमारतीत राहतो आणि त्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी, चौकशी केली असता, आपण रस्त्यावर फटाके विकतो आणि पावसामुळे आपण ते आपल्या गाडीतच ठेवले होते, असा दावा गाडी मालकाने केला आहे. तसेच, यासंदर्भात आम्ही सर्वांचा कसून तपास करु आणि त्यानुसार कारवाई करू, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांंनी दिली आहे.
प्रकरणाची सखोल चौकशी करावी - प्रकाश सुर्वे
"गेल्या पाच-सहा दिवसांपासून ही गाडी या ठिकाणी उभी होती. उद्या स्वातंत्र्यदिन आहे. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला असता तर कोण जबाबदार राहिले असते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी," अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे.
हेही वाचा - स्वातंत्र्याची 75 वर्षे : कर्नाटकातील जालियानवाला बाग विदुरश्वतामध्ये काय झाले होते? जाणून घ्या