मुंबई - गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून बंद असलेली मुंबई टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. आज (शुक्रवार)पासून वाहनांच्या वाहतुकीवरील बंधने शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली असून भायखळा, जेजे उड्डाण पुलाखाली वेगवेगळी दुकाने उघडण्यात आली आहेत.
जगभरात कोरोनाने थैमान घातले. देशातही कोरोनाने चांगलेच पाय पसरवले असून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 26 हजार 770 पोहोचला आहे. मुंबईत देखील कोरोनाबाधितांची संख्या ४४ हजारांच्या घरात पोहोचली आहे. तसेच मृतांचा आकडा १ हजार ४६५ वर पोहोचला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. गेल्या ३१ मे रोजी पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यानंतर पहिले लॉकडाऊन अनलॉक करण्यात आले. मुंबई देखील आता काही प्रमाणात सुरू होत आहे. गेल्या ३ जूनला काही निर्बंध शिथिल करण्यात आली. त्यावेळी काही भागात मॉल, दूध, औषधांची विक्री करणाऱ्या दुकानांसह कपडे, पादत्राणांची शोरूम, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स आदी दुकाने सुरू झालेली पाहायला मिळाली.
आज ५ जूनला वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळाली. तसेच सम व विषम पद्धतीने दुकाने उघडली जात आहेत. याबरोबरच सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती अंशतः वाढविण्यात आली आहे.