मुंबई : वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संसदेच्या भव्य दिव्य इमारतीचे बांधकाम विक्रमी काळात पूर्ण झाले. पंतप्रधानांचे त्याबद्दल कौतुक परंतु राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे होते. लोकशाहीची ही अवेहलना आहे, असे टीकास्त्र खासदार विनायक राऊत यांनी सोडले. काहीजण सेंगोलला संसदेचा अर्थ लावण्याचा खटाटोप करत आहेत. लोकशाहीत बिघाड करण्याचा एकप्रकारे प्रयत्न होतोय. न्यायालयावर निर्णय देईल मात्र, त्यांचं पावित्र्य राखणं गरजेचे असून सर्वस्वी सरकारची जबाबदारी असे, राऊत म्हणाले.
वीर सावरकर राजकीय वापर : वीर सावरकर यांचा राजकीय वापर करणाऱ्या भाजप, शिंदे सरकारवर विनायक राऊतांनी घणाघाती टीका केली. भाजप वीर सावरकरांच्या नावाने राजकारण करत आहेत. उदोउदो करण्याचा त्यांना अधिकार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातत्याने वीर सावरकर यांच्या बाजूची भूमिका घेतली आहे. वीर सावरकरांवर टीका करणाऱ्यांना उघडपणे कान टोचण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आले आहेत. देवेंद्र फडणवीस असो किंवा भाजपचा कोणताही नेता असो त्यांच्यात ती हिंमत नाही, असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला.
भाजप, शिंदे गटाची पोटदुखी : सध्या शिंदे गट मोदी भक्त झाला आहे. त्यामुळेच ठाकरेंवर टीका करत आहेत. टीका करणे व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीच नाही. ठाकरेंच्या नावाची त्यांना कावीळ झाली आहे. तरीही उद्धव ठाकरे यांना जनमानसात मोठा प्रतिसाद मिळतो आहे. भाजप, शिंदे गटाला यामुळे पोटदुखी झाली आहे. उदय सामंत, शंभूराज देसाई शिंदे गटातील बोलके पोपट आहेत. त्यांच्या बोलण्याला आम्ही भीक घालत नाही, असे राऊत यांनी सांगितले.
सावरकरांना भारतरत्न : वीर सावरकर यांची आज जयंती आहे. सावरकरांच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजपने, मुख्यमंत्री शिंदे यांनी सावरकरांना भारतरत्न मिळवून द्यावा. दिल्लीत गेला आहात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, असा खोचक चिमटा विनायक राऊत यांनी काढला. मुख्यमंत्री शिंदेंवरही आसूड ओढले. मुख्यमंत्री शिंदे आरएसएस आणि भाजपची स्क्रीप्ट वाचत आहेत. त्यांचे स्वतःचे असे काही नाही, असा टोला देखील यावेळी लगावला.
हेही वाचा -