मुंबई - बहुजन वंचित आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वळचणीला गेले असल्याचा आरोप करणाऱ्या लक्ष्मण माने यांनी आठ दिवसात बाळासाहेब आंबेडकरांचे माफी मागावी. असे न केल्यास अब्रुनुकसानीचा खटला दाखल करून पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव डॉ. अंजरिया यांनी दिला आहे. शहरात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
लक्ष्मण माने यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करून पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. पडळकर आणि डॉ. अन्सारी यांच्यावरील आरोपाचा ८ दिवसात खुलासा करावा. असे न केल्यास थेट अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय पक्षांतर्गत शिस्तभंग केल्याप्रकरणी पक्षनेतृत्व लक्ष्मण मानेंवर कारवाई करेल, असा इशारा डॉ. अंजरिया यांनी दिला.
वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत ४२ लाख मते घेऊन राजकीय अस्तित्व दाखवून दिले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ४० विधानसभा जागांचीची ऑफर दिली आहे. याबाबत काँग्रेसने ८ दिवसात सांगितले नाहीतर 288 विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले जातील, असा अल्टिमेटम देखील त्यांनी यावेळी दिला.
गोपीचंद पडळकर हे वंचित आघाडीमध्ये आघाडीवर आहेत. त्याचाच राग धरून लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर आणि डॉक्टर अन्सारी यांच्यावर आरोप केल्याचे अंजरीया म्हणाले. भविष्यात वंचितची ताकद वाढत असून आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे जास्तीच्या जागा निवडून वंचित आघाडी आपली राजकीय ताकद दाखवून देईल, असेही ते म्हणाले.