मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला हादरा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आज पुन्हा एकदा बॉम्ब टाकला आहे. आमची 288 विधानसभा लढायची तयारी आहे, आम्ही काँग्रेसला 40 जागा देण्यास तयार आहे, मान्य असल्यास 10 दिवसात कळवावे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. आज मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पडळकर माध्यमांशी बोलत होते.
यावेळी गोपिचंद पडळकर म्हणाले, काँग्रेस पक्षाने युतीबाबत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. अशोक चव्हाणांची ऑफर आम्हाला पेपरमधूनच समजली. जर काँग्रेसला वंचितबरोबर युती करायची असेल तर आम्ही त्यांना 10 दिवसाची मुदत देतो. आम्ही काँग्रेसला 40 जागा देण्यास तयार आहोत. त्यांनी 10 दिवसात निर्णय कळवावा, असे पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसला कोणत्या 40 जागा पाहिजेत हे त्यांनी सांगावे, अशा शब्दात वंचितने काँग्रेसला अल्टीमेटम दिला आहे. आम्हाला जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे आम्ही ठरवणार काँग्रेसला किती जागा द्यायच्या. काँग्रेसने ठरवावे त्यांना कोणत्या जागा पाहीजेत, असे पडळकर यांनी सांगितले.
ज्यांना काँग्रेस अथवा भाजपमध्ये तिकीट मिळणार नाही, ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही पडळकरांनी यावेळी केला. तर आम्ही भाजपची बी टीम आहोत, असा काँग्रेसने आमच्यावर आरोप केला होता. त्याचा खुलासा अजूनही काँग्रेसने केला नाही. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकरांची भेट होऊ दिली, नसल्याचा आरोपही पडळकर यांनी यावेळी केला.
यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित नव्हते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर, अॅड. आण्णाराव पाटील, वर्किंग कमिटीचे सदस्य अॅड. अंजारिया, डॉ. अरुण सावंत उपस्थित होते.