मुंबई : 'वंदे भारत एक्स्प्रेस' ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असल्याने मध्य रेल्वे सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. मात्र, मध्य रेल्वेवर मुंबई-पुणे मार्गावर लोणावळा आणि खंडाळा यासारखे मोठे घाट आहेत. या घाटावर मेल एक्स्प्रेस गाड्यांना आणखी एक अतिरिक्त इंजिन म्हणजेच बँकर्स लावावे लागणार आहेत.
पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदिल : घाट विभागात बॅंकर्सचा वापर गाड्या ढकलण्यासाठी केला जातो आणि डबे तुटल्यास ट्रेन मागे जाण्याच्या घटना टाळल्या जातात. परंतु बँकर्सला जोडण्याच्या आणि विलग करण्याच्या प्रक्रियेस किमान काही मिनिटे लागतात. तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रवासाचा वेळ वाढतो. हा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी, रेल्वे अधिकाऱ्यांनी बँकर न जोडता या दोन्ही मार्गांवर सेमी हाय-स्पीड गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकर्स न लावता या ट्रेनची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे येत्या १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर या दोन्ही ट्रेनला हिरवा कंदील दाखवणार आहेत.
बिझनेस क्लास, नोकरदारांना फायदेशीर : 'वंदे भारत एक्स्प्रेस' ही सकाळची ट्रेन आहे. यामुळे या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास नाही. याच मार्गावर इतर मेल एक्स्प्रेस ट्रेन धावतात त्यांचे तिकिटाचे दर कमी आहेत. इतर मेल एक्स्प्रेसच्या तुलनेत 'वंदे भारत एक्स्प्रेस'च्या तिकिटाचे दर अधिक आहेत. जे लोक खासगी गाड्या घेऊन शिर्डी येथे साईबाबा व सोलापूर येथे भवानी मातेच्या दर्शनाला जातात त्यांना या ट्रेनमुळे दिलासा मिळणार आहे. ज्या लोकांना दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर यायचे आहे अशा नोकरदार आणि बिजनेस करणाऱ्या लोकांना ही ट्रेन फायदेशीर आहे. ही ट्रेन घाटामध्ये कशी चालवली जाऊ शकते असा प्रश्न होता, मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे. राजकीय आणि प्रशासनाकडे इच्छा शक्ती असेल तर कोणतेही काम शक्य होऊ शकते असे रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.
किती तासात प्रवास होणार : साडेपाच तासात शिर्डी : 'वंदे भारत एक्स्प्रेस' छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ६.१५ वाजता रवाना होणार असून, दुपारी १२.१० वाजता शिर्डी येथे पोहोचेल. त्याच दिवशी ही एक्प्रेस शिर्डी येथून सायंकाळी ५.२५ वाजता रवाना होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ११.१८ मिनिटांनी एक्स्प्रेस मुंबईत पोहोचेल. या एक्सप्रेसने मुंबई ते शिर्डी अंतर पार करण्याठी ५ तास ३० मिनिटे लागणार आहेत.
साडेसहा तासांत सोलापूर : 'वंदे भारत एक्स्प्रेस' छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ४.१० वाजता रवाना होणार असून, सायंकाळी ७.१० वाजता पुणे येथे पोहोचेल. तर सोलापूरला रात्री १०.४० वाजता पोहचेल. रात्री ही एक्सप्रेस सोलापूर येथे मुक्काम करणार दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०५ वाजता रवाना होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी १२.३५ वाजता पोहचेल. या एक्स्प्रेसला मुंबई ते पुणे हे अंतर पार करण्यासाठी ३ तास तर मुंबई ते सोलापूर हे अंतर पार करण्यासाठी ६ तास लागणार आहेत.
किती आहे तिकिटाचा दर : 'वंदे भारत एक्स्प्रेस' छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पुणे येथे जाण्यासाठी चेअर कारसाठी ५६० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११३५ रुपये तिकीट असणार आहे. मुंबई ते नाशिक जाण्यासाठी चेअर कारसाठी ५५० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११५० रुपये तिकीट असणार आहे. मुंबई ते शिर्डी प्रवासासाठी चेअर कारसाठी ८०० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १६३० रुपये तिकीट असणार आहे. तर मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी चेअर कारसाठी ९६५ रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १९७० रुपये तिकीट असणार आहे.
ट्रेनमध्ये काय खायला मिळणार : 'वंदे भारत एक्स्प्रेस'मध्ये ही सकाळची ट्रेन असल्याने नाश्ता मध्ये बेसन पोळा, ज्वारीची भाकरी, चिवडा, शेंगदाणा हे पदार्थ दिले जाणार आहेत. जेवणाच्या वेळी शकलारी प्रवाशांना झुणका नाचणीची भाकरी, शेंगदाणा पुलाव, मटर शेंगदाणा पुलाव तर मांसाहारी प्रवाशांना चिकण कोल्हापूरी, चिकण तांबडा रस्सा, सावजी चिकण हे पदार्थ दिले जाणार आहेत.
काय आहे वंदे भारत एक्स्प्रेस : 'वंदे भारत एक्स्प्रेस' ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वेसेवा आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आली. भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' या उपक्रमाअंतर्गत १८ महिन्यांच्या कालावधीत १०० कोटी रुपये खर्चून या रेल्वेगाडीची संकल्पना, विकास व निर्मिती केली गेली. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी ह्या शहरांदरम्यान धावली. ही ट्रेन ताशी १२० किलोमीटर वेगाने धावते. या गाडीचे सर्व डबे वातानुकूलित आहेत. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिडीओ प्रणाली, स्वयंचलित खिडक्या दरवाजे, अत्याधुनिक सीसीटीव्ही, इमरजन्सी पुश बटन, व्हॅक्युम सुविधा असलेले शौचालये, १८० अंश फिरणारी आसने आदी सुविधा या ट्रेनमध्ये आहे. या ट्रेनच्या धावण्याच्या गतीमुळे हजारो प्रवाशांचा प्रवासामधील वेळ वाचणार आहे.
हेही वाचा : PM Modi Speech: तुमच्या पायाखालची जमीन सरकली! पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल