मुंबई : केंद्रातील मोदी आणि भाजपा सरकारच्या विरोधात देशभरामध्ये उभ्या राहिलेल्या 'इंडिया' (INDIA) या विरोधी आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. ग्रँड हयात मधील या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. तसंच महाविकास आघाडीतले अन्य घटक पक्ष सुद्धा या बैठकीला निमंत्रित आहेत. मात्र असं असलं तरी, राज्यात प्रभावी असलेल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या समावेशाबद्दल संभ्रमाचं आणि अविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे.
वंचितला स्थान देण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न : इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाला स्थान मिळावं, या पक्षाचे नेते अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घ्यावं. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला विनंती केली आहे. मात्र काँग्रेसनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही मागणी धुडकावून लावली. वंचित बहुजन आघाडी पक्षाने शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणून न येता, थेट आघाडीत सामील व्हावं. तरच त्यांना बैठकीला निमंत्रण देता येईल, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात वंचितला सोबत घेण्याविषयी चर्चा सुरू आहे. तर अद्याप निर्णय नाही असं वक्तव्य करून संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं आहे.
निमंत्रण पाठवण्यात आल्याची चर्चा : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं की, इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्याशी चर्चा केली असता, अशा पद्धतीचं कोणतंही निमंत्रण पक्षाला मिळालं नसल्याचं त्यांनी सांगितलं.
ब्राह्मणशाही आणि सरंजामदार मराठ्यांचा डाव : वंचितला निमंत्रण देण्याबाबतची चर्चा विजय वडेट्टीवार यांनी सुरू केल्याचं माध्यमांमधून समजलं. मात्र हा डाव असून, वंचितनं इंडिया आघाडीत सहभागी होऊ नये यासाठी ब्राह्मणशाही आणि सरंजामदार मराठे यांची अभद्र युती आहे. त्या युतीनं हा डाव केला असल्याचा आरोप मोकळे यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडी हा असा एकमेव पक्ष आहे, जो या अभद्र युतीला देशभरामध्ये शह देऊ शकतो. मात्र या अभद्र युतीला शह दिला जाऊ नये, यासाठीच वातावरण बिघडण्याचा आणि मन कलुशीत करण्याचा हा प्रयत्न काही लोक करत आहेत. जर अशा पद्धतीचं कोणतंही पत्र अथवा निमंत्रण त्यांनी दिलं असेल तर स्वाक्षरी असलेलं पत्र जनतेसमोर खुलं करावं असं आवाहनही मोकळे यांनी केलं आहे.
हेही वाचा -