मुंबई - मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाबत वेळीच उपाययोजना व नियोजन करता यावेत म्हणून कोरोना रुग्णांची आणि मृत्यूंची आकडेवारी 48 तासात 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' अर्थात 'आय.सी.एम.आर.' च्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना तसेच खासगी लॅबना दिले आहे.
'कोरोना कोविड-19' या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. त्यासाठी रुग्ण आणि मृतांची आकडेवारी उपलब्ध असल्यास आवश्यकतेनुसार योग्य ते नियोजन अधिक प्रभावीपणे करणे शक्य होते. ही बाब लक्षात घेऊन 'कोविड-19' बाधा झालेल्या व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्या विषयीची आकडेवारी व तपशिल हा मृत्यू झाल्यापासून 48 तासांच्या आत व निर्धारित नमुन्यात 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' अर्थात 'आय.सी.एम.आर.' च्या संकेतस्थळावर अपलोड करणे अत्यंत गरजेचे असून त्यानुसार सदर आकडेवारी 48 तासात 'अपलोड' करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग' द्वारे आयोजित पालिकेतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहे. आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'कोविड-19' बाधित रुग्णांचे अहवाल व आकडेवारी 24 तासांच्या आत 'आय.सी.एम.आर.' च्या संकेतस्थळावर 'अपलोड' करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी गेल्याच आठवड्यात मुंबईतील सर्व संबंधित प्रयोगशाळांना दिले होते. तसेच सदर आकडेवारी वेळच्यावेळी अपलोड होत असल्याची खातरजमा करण्याचेही त्यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले होते. त्यानंतर ही कार्यवाही वेळच्यावेळी न करणाऱ्या मेट्रोपोलीस या खासगी प्रयोगशाळेवर प्रतिबंध देखील घालण्यात आले आहेत.
आता महापालिका आयुक्तांनी 'कोविड' बाधित रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याविषयीची आकडेवारी 48 तासांच्या आत 'आय.सी.एम.आर.' च्या संकेतस्थळावर 'अपलोड' करण्याचे निर्देश दिल आहेत.