मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत दादर, परळ भागात रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आता देखील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. आगामी दोन दिवस असेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली.
मुंबईतील पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील अनेक भागात आज अचानक पावसाने हजरी लावली आहे. ऐन थंडीत पाऊस पडल्याने चाकरमान्याची तारांबळ उडाली. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली. सकाळी दादर, माटुंगा, माहिम, विक्रोळी, भांडुप या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
वसई-विरारमध्येही पावसाची हजेरी -
राज्याच्या हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासून वसई-विरारम शहरी व ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली होती. या पावसाने वातावरणात गारवा पसरला आहे. कामधंद्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची सकाळीच आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली.
पालघरमध्ये विटभट्टी व्यावसायिकांना फटका -
किनारपट्टी आणि ग्रामीण भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे समुद्रकिनाऱ्यावर सुकण्यासाठी टाकलेली मासळी व विटभट्टी व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. आणखी जोराचापाऊस झाल्यास रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये येत्या काही तासात वादळी-वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.
रायगडमध्ये आंबा पिकावर परिणाम होण्याची भीती -
रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे. पोलादपूरपासून अलिबागपर्यंत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. काही ठिकाणी सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. अवकाळी पावसामुळे आंबा पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.