मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजनने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पाऊस, काही जिल्ह्यात अवकाळीच्या हलक्या सरी तर काही जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या कोकण विभागात अवकाळी पावसाच्या मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, नाशिक या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन भारतीय हवामान विभागाने केले आहे.
शेतकरी संकटात, हवामान विभागाचे आवाहन : राज्यातील शेतकरी शेतीमालाला हमीभाव नसल्याने संकटात सापडला आहे. मात्र, आता गारा आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. एका बाजूला शेतात वर्षभर राबुन उभे केलेले पीक काढणीला आलेले असतानाच, आता पुढील आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढील आणखी दोन दिवस आपल्या पिकाची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजनने केले आहे.
कमाल तापमानात 2 अंशांची घट : दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या मुंबई विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हवामानात प्रचंड वेगाने बदल होत आहेत. जेव्हा एका ठिकाणी कडकडीत ऊन पडलेले असते, त्याचवेळी डोंगराळ भागात ढगाळ वातावरण असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने दिवसभराच्या कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकाची काळजी घेऊन पुढील दोन दिवस अलर्ट राहावे, असे आवाहन राज्याच्या हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
'या' जिल्ह्यांत अलर्ट : मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता अतिशय कमी आहे, त्यामुळे या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई विभागातील भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा : मुंबईकरांनो निरोगी राहा, उद्यानांसह मैदाने अधिक वेळ राहणार खुली, पहा नवीन टाईमटेबल!