मुंबई - वांद्रे पश्चिम येथील एच (पश्चिम) येथे बडी मज्जिद, उर्दु शाळेजवळील रस्त्यावरील अनधिकृत बाजार बी पी ई मराठी हायस्कूलच्या पटांगणावर भरत आहे. लॉकडाऊनचा फायदा उठवला जात आहे. नफा कमवण्यासाठी जे कधीही फेरीवाले नव्हते, अशा व्यक्ती भाजीपालाची विक्री करू लागल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत समाजसेविका नलिनी परब यांनी मांडली आहे.
फक्त अधिकृत फेरीवाल्यांना विक्रीची परवानगी मिळायला हवी, अशी मागणीही परब यांनी केली आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भरवस्तीत शाळेच्या पटांगणावर ऐन लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात आहे. या शाळेपासून फक्त शंभर मीटर अंतरावर वांद्रे पालिका टाउन मार्केट आहे, असे असताना अनधिकृत फेरीवाल्यांची शाळेच्या आवारात सोय केली जात आहे. पालिकेचा अधिकृत बाजार असताना हाकेच्या अंतरावर शाळेच्या पटांगणावर अनधिकृत फेरीवाल्यांची सोय करण्यामागे फेरिवाल्यांच्या एजंटामार्फत मिळणारी मोठी रक्कम असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.