घाटकोपर (मुंबई) - कोरोना विषाणूशी लढताना प्रशासनासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते गर्दी कमी करण्याचे आणि समाज माध्यमावरील अफवांवर नियंत्रण मिळवण्याचे. या अफवांमुळे वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत असून, अफवा न पसरवण्याची विनंती घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी केली आहे.
राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला असून, मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासन खबरदारी म्हणून, रुग्ण आढळलेला भाग सील करून नागरिकांची तपासणी केली जात आहे. तसेच काहींना अलगिकरण करण्यात येत आहे. परिसरही निर्जंतुक करण्यात येत आहे. यातच काही रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर्स, पोलीस कर्मचारीही बाधित आढळल्याने सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालिका आरोग्य विभाग व घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी सक्षम असल्याचे अधिष्ठाता विद्या ठाकूर म्हणाल्या आहेत.
ठाकूर म्हणाल्या, करोनाशी लढण्यासाठी विविध सेवा पुरवल्या जात आहेत. त्यात अनेक नव्याने रुग्णालय सज्ज होत आहेत. राजावाडी रुग्णालयात देखील 100 खाटांचे सुसज्ज विलगीकरण कक्ष निर्माण केले जात आहे. सर्वच वैद्यकीय कर्मचारी हे निरोगी सेवा देण्यात सज्ज आहेत. कर्मचाऱ्यांना डॉक्टरांना योग्य अशी प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे. प्रशासनाने सांगितलेले सोशल डिस्टन्स, गर्दी न करणे असे आवाहन करूनही नागरिक गर्दी करीत असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
नागरिक नियम पाळत नसल्यामुळे रुग्नसेवा देणाऱ्या कर्मचारी वर्गाचे नागरिकांच्या अश्या सवयीमुळे खच्चीकरण होत आहे. देशसेवा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर आरोग्य सेवा देणारे मागे वळून पाहत नाहीत. देशाच्या सीमेवर जाता येत नाही तर देशातील नागरिकांना अश्या संकटात सेवा देऊन आपणही देशसेवा करतो, अशी भावना विद्या ठाकूर यांनी मांडली आहे.