मुंबई - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपा सोडणार असल्याची चर्चा आहे. खडसे हे भाजपा सोडणार नाहीत. त्यांनी भाजपा सोडल्यास आरपीआयमध्ये यावे आणि राज्यातील सरकार पाडण्यास मदत करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. दादर चैत्यभूमी संदर्भात त्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, एकनाथ खडसे हे माझे चांगले मित्र आहेत. ते भाजपा सोडतील असे वाटत नाही. मात्र, सोडल्यास त्यांनी आरपीआयमध्ये यावे. आरपीआयच्या कोट्यातून त्यांना सत्तेत सहभागी केले जाईल.
हाथरस प्रकरण -
उत्तर प्रदेश येथील हाथरसप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजकारण करू नये. राजस्थानमध्येही मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत आहेत. काँग्रेसचे सरकार असल्याने राहुल गांधी त्याठिकाणी भेट देत नाहीत का? असा प्रश्न आठवले यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांच्याबाबत बोलताना शिवसेनावाले हाथरसला का गेले नाहीत? हाथरस प्रकरणी आम्ही आंदोलने केली आहेत. शिवसेनेने आंदोलने का केली नाहीत? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राऊत यांनी माझ्याबाबत टिप्पणी करू नये. मी कंगनाला पाठिंबा दिला होता. तिच्या वक्तव्याला नाही. मी नट्यांच्या घोळक्यात राहत नाही, असेही आठवले यावेळी म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी आठवले यांचा एकही आमदार खासदार नसल्याने त्यांना गांभीर्याने घेऊ नये, असे वक्तव्य केले आहे. याबाबत बोलताना पवार हे माझे मित्र आहेत. मी त्यांना उत्तर देणार नाही. मी जी भूमिका घेतली आहे ती ज्यांना गांभीर्याने घ्यावी, असे वाटत असेल त्यांनी घ्यावी. कोणाला ती भूमिका योग्य वाटत नसेल तर त्यांनी ती गांभीर्याने घेऊ नये. माझ्या मनाला जे वाटते तेच मी बोलतो, असेही ते म्हणाले.
सरकारची बदनामी नाही -
सुशांतसिंह प्रकरणी एम्सने अहवाल दिला आहे. एम्सने आत्महत्या की हत्या? असा अहवाल द्यायला पाहिजे होता. जो अहवाल दिला आहे, त्यानुसार सीबीआयने लवकरात लवकर तपास करावा. मुंबई पोलिसांनी तपास वेळेवर केला असता तर सीबीआय चौकशीची गरज पडली नसती, असे आठवले म्हणाले. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंट असल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना त्याबाबत मला काही माहीत नाही. विरोधकांनीही अशी अकाऊंट उघडावीत, असा सल्ला आठवले यांनी दिला आहे. हा बदनामीचा भाग नाही, ते राजकारण करतात. आम्हीही राजकारण करत आहोत, असे आठवले म्हणाले.