मुंबई : राज्यात नव्या समीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शेकडो समर्थकांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला. मातोश्री येथे पक्ष प्रवेश झाला यावेळी शिवसेना नेते भास्कर जाधव उपस्थित होते.
ठाण्यात ठाकरेंची क्रेज : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिंदे गट तसेच काहीनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती लागली असताना इतर पक्षातून ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. यातच आज केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला. ठाण्यात भाजपचा प्राबल्य वाढत असला तरी ठाण्यात ठाकरे आडनावाची क्रेज कायम आहे. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाण्यातील हातावर मोजण्या इतके कार्यकर्ते सोडले, तर जवळपास सर्वच जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या परिस्थितीतही ठाकरे यांनी आपल्या सेनेचा दबदबा कायम राखला आहे.
शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश : ठाणे जिल्हा ग्रामीणचे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस शशांक हरड, शहर तालुका उपाध्यक्ष तेजस पडवळ, प्रमोद निचिते, खिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंच नीता वातसे, उपसरपंच शिवानी हरड, यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांसह शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे हे खंदे समर्थक मानले जातात. उद्धव ठाकरे यांच्या सर्व समावेशक विचारांवर विश्वास ठेवून आम्ही पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
पक्षप्रवेशानंतर घोषणाबाजी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद असे नारे देऊन मातोश्रीचा परिसर शिवसेनेकांनी यावेळी दणाणून सोडला.