मुंबई - बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन केंद्रात मंत्री झालेले नेते भिकारी आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता आनंदराज यांनी त्यांना दलाल म्हटले.
वंचित बहुजन आघाडीचे विक्रोळी विधानसभेचे उमेदवार सिद्धार्थ मोकळे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आंबेडकरांनी हे वक्तव्य केले. विक्रोळी विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीने सिद्धार्थ मोकळे या तरुण नेतृत्वाला उमेदवारी दिली आहे. आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन सिद्धार्थ मोकळे यांना निवडून द्यावे, असे आवाहन आनंदराज यांनी केले.
हेही वाचा - ठरलं! राहुल गांधी 'या' तारखेला राज्यात प्रचाराला येणार
आठवलेंच्या आरपीआय पक्षाला भाजप-शिवसेनेने राज्यातील विधानसभा निवडणुकीत किती जागा दिल्या हे सर्वांना माहीत आहे. ते केवळ भाजप- शिवसेना मला काहीतरी देतील या आशेने त्यांचे गुणगान गात फिरत असतात. राज्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे. यावेळी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन दिसून येईल असेही आंबेडकर म्हणाले.