मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षात फुट पडली. तेव्हा भाजपचे चाणक्य आणि सरकार बांधण्यात पटाईत असलेले भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबई किंवा महाराष्ट्रात फिरकले नाहीत. मात्र आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस समवेत महाशिवआघाडीचे शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार दृष्टीपथात असताना शाह येत्या ४ डिसेंबरला महाराष्ट्रात येत आहेत. नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये प्रमुख स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला शाह उपस्थित राहणार आहेत.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर महायुतीला बहुमत मिळाले खरे. पण मुखमंत्री पदाच्या मागणीसाठी महायुतीत कलह निर्माण झाला आणि अखेर महायुती तुटली.
केंद्रात एकमेव मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांना शिवसेनेने मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगितलं. या घडामोडी घडत असताना केंद्रीय स्तरावरून भाजपकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन अवघड वाटत असलेली युती शिवसेनेला सोबत जुळवली. मात्र, विधानसभेच्या सत्तास्थापनेसाठी ते महाराष्ट्रात फिरकले नाहीत.
विधानसभेच्या निकालानंतर शाह सत्तेचा तिढा सोडवतील अशी आपेक्षा भाजप नेत्यांना होती. मात्र, शाह एकदाही महाराष्ट्रात फिरकले नाहीत. त्यांनी शिवसेने विषयी बोलणेही टाळले. तसेच या काळात ते एकदाही महाराष्ट्रात कार्यक्रमासाठी फिरकले नाहीत. मात्र आता एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने शाह महाराष्ट्रात येत आहेत.