मुंबई - केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे, असा आरोप 'शेतकरी आत्महत्या करणार नाही अभियाना'चे प्रमुख माणिक कदम यांनी केला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी पॅकेज बाबत शेतकरी हिताच्या गप्पा करणाऱ्या संघटना आणि विरोधी पक्ष मुग गिळून गप्प असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शेतकरी आणि शेतमजुर कामगार यांना पॅकेजमध्ये काही नाही. मात्र, कोण बोलणार? आम्ही बोललो तर प्रसार माध्यमे म्हणतात, किती मोठे पॅकेज आहे. शेतकऱ्यांना नसेल द्यायचे तर देऊ नका. मात्र, असले तोंडाला पाने पुसणारे, निराधार आकडेवारी, दिशाभूल करणारे पॅकेज जाहीर करू नका. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा जशी होती तसेच हे पॅकेज आहे. सर्वात कहर म्हणजे आधी तीन कोटी शेतकऱ्यांना दिलेल्या (कोणाला दिले हे माहीत नाही) चार लाख कोटी रुपयांचे कर्ज या पॅकेजमध्ये समाविष्ट केले आहे. मग पंतप्रधान मोदींना याबाबत परवा सांगता येत नव्हते का? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - पॅकेज म्हणजे अर्थसंकल्पात करावयाच्या घोषणा नव्हेत - अशोक चव्हाण
हे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेकीच्या पलीकडे काहीही नाही. देशातील शेतकरी नेत्यांनी किमान एखादे प्रसिद्धी पत्रक काढून तरी याला विरोध दर्शवायला पाहिजे. मात्र, काही चार/दोन लोक वगळता कोणीही या विषयावर शब्द काढण्यास तयार नाही, अशी खंत माणिक कदम यांनी व्यक्त केली आहे.
तर देशातील जाऊ द्या. किमान राज्यातील सर्व पक्षांतील नेत्यांनी यावर बोलू नये? आयटी सेलचे लोक शहरात सोशल मीडियामध्ये शेतकऱ्यांना कसे इतके ऐतिहासिक मोठे पॅकेज दिले, वगैरे पुड्या सोडत आहेत. मात्र, त्याचे खंडन कोणी करायचे, असा सवाल शेतकरी नेते योगेश पांडे यांनी देखील उपस्थित केला आहे.