मुंबई : राजकारणामुळे अनेक कुटूंबात वाद असल्याचे पाहावयास मिळते. अशोक पाटील निलंगेकर-संभाजी पाटील निलंगेकर, जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर, सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे, गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमधील वाद हे सर्वांना माहित आहेत. राजकारणामुळे वैयक्तिक मतभेद, तसेच या घरांत फूट पडल्याचे दिसून येते.
अशोक पाटील निलंगेकर-संभाजी पाटील निलंगेकर : या यादीत पहिले नाव अशोक पाटील निलंगेकर-संभाजी पाटील निलंगेकर या काका पुतण्यांच्या जोडीचे येते. राज्याची तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या कुटुंबात देखील काका पुतण्यांचा वाद आपल्याला पाहायला मिळेल. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अशोक पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली केली होती. तर भाजपने त्यांचे पुतणे संभाजी पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काकांना मात देत 21 हजार मतांनी विजय विजय मिळवला.
जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर : पुढची काका पुतण्यांची जोडी बीडच्या क्षीरसागर कुटुंबातील जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांची आहे. बीडमध्ये असे म्हटले जाते की, बीडचे राजकारण जसे मुंडे कुटुंबीयासभोवती फिरते, तसेच ते क्षीरसागर कुटुंबाभोवती देखील फिरते. क्षीरसागर कुटुंबीय सुरुवातीपासून काँग्रेसचे नेते होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला. तत्कालीन शिवसेनेत प्रवेश केला. त्याच वेळी बीडमधून राष्ट्रवादीने त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी काकांवर मात करत विजय मिळवला होता.
सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते सुनील तटकरे यांच्या घरात देखील राजकारणामुळे फाटाफूट झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत अवधूत तटकरे यांनी तत्कालीन शिवसेनेत प्रवेश केला. काका सुनील तटकरे व पुतण्या अवधूत तटकरे यांच्यातील वादावर शिक्कामोर्तब झाला. आज घडीला सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार आहेत. तर, त्यांची मुलगी आदिती तटकरे या विधानसभेत आमदार आहेत. अदिती तटकरे यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्य मंत्रिपद देखील भूषवले. सोबतच सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे देखील विधान परिषदेवर आमदार आहेत. मात्र, पुतण्या अवधूत तटकरे सध्या काय करतात, याची माहिती उपलब्ध नाही.
गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे : बीड जिल्हा म्हटले की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर मुंडे घराण्याचे नाव येते. बीडच्या राजकारणात मुंडे घराण्याचा मोठा दबदबा आहे. आजही बीडच्या राजकारणात सगळ्यात चवीने चर्चेला जाणारा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे आणि काका गोपीनाथ मुंडे यांच्यात असलेले वाद. आज गोपीनाथ मुंडे हयात नसले तरी या काका पुतण्यांमधील वाद आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय असतात. या वादाची सुरुवात देखील राजकीय वारसावरूनच झाल्याचे जाणकार सांगतात.
भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश : राजकीय तज्ज्ञांच्या मते या वादाची सुरुवात त्यावेळी झाली, जेव्हा गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष देत असतानाच देशाच्या राजकारणात देखील आपले पाय घट्ट रोवत होते. त्यावेळी धनंजय मुंडे हे बीड आणि परळीच्या स्थानिक राजकारणात आपली पकड मजबूत करत होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे हे लोकसभेवर गेले तर विधानसभेतून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत असताना पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले. त्यांनी स्थानिक राजकारणात बंड करायला सुरुवात केली. अखेर 2013 साली त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या काका पुतण्यांमध्ये फूट पडली.
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे : महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात चवीने चघळला जाणारा काका पुतळ्यांचा वाद म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाद होय. आता बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात वाद का झाले याची सर्वांनाच माहिती आहे. मात्र, आज देखील राज ठाकरेंची कोणतेही मुलाखत, सभा अथवा चर्चा ही बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनच सुरू होते. शेवटी बाळासाहेब ठाकरेंपर्यंतच येऊन संपते. आज शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आहेत. शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पुढचा उत्तराधिकारी कोण? यातून सुरू झालेला हा वाद आज देखील महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असतो.
शरद पवार आणि अजित पवार : शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाच्या बातम्या लोक आवडीने वाचतात. सध्या अजित पवार हे भाजपसोबत जातील, अशा चर्चा आहेत. अजित पवार यांना शरद पवार यांचा उत्तर अधिकारी व्हायचे आहे, असे देखील म्हटले जाते. मात्र सोबतच आगावी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे राष्ट्रवादीतून वेगळे झालेले दिसतील, असे मत देखील काही तज्ञ सध्या व्यक्त करत आहेत. याला जोड म्हणजे काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस व अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अजित पवार यांना काकांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. तर, अजित पवार यांनी देखील राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देत ज्याप्रमाणे तुम्ही काकांकडे लक्ष दिले, त्याचप्रमाणे मी देखील माझ्या काकांकडे लक्ष देईल असे म्हटले. त्यामुळे अजित पवार हे काका शरद पवार यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला.
राजकीय विश्लेषक काय सांगतात? आता अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडतील का? पवार कुटुंबात देखील राजकारणामुळे फाटा फूट होईल का? हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, या सर्वांवर आपले मत व्यक्त करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात की, आपण जर नीट बारकाईने पाहिले तर, या सर्वांमागे महाशक्ती असल्याचे दिसून येईल. म्हणजे एका बाजूला शिवसेनेत फूट पडत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपला टक्कर देईल असा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील सध्याच्या आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचे आपल्याला दिसून येईल. यात सगळ्यात जास्त दबाव हा अजित पवार यांच्यावर आहे. याच दबावामुळे आज राष्ट्रवादीतील पहिल्या फळीचे नेते छगन भुजबळ देखील अजित पवार यांच्या मतासोबत असल्याचे आपल्याला दिसेल. पुणे जिल्ह्यातील आमदारांचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातील आमदार हे अजित पवार सांगतील तेच करताना दिसतील. मात्र, सध्या ज्या काही सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. त्यामुळे हे यश पाहता अजित पवार कदाचित आपला निर्णय बदलू देखील शकतात, कारण की यातून राज्याची स्थिती आपल्या लक्षात येते.
राजकारणाची हवा बदलत आहे : पुढे बोलताना हेमंत देसाई यांनी सांगितले की, शरद पवार यांचे काँग्रेससोबत वाद झाले. ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष काढला. पक्ष वाढवला. मात्र, काँग्रेसमधून बाहेर पडून सुद्धा त्यांनी आतापर्यंत केवळ काँग्रेससोबतच आघाडी केलेली आपल्याला दिसून येईल. या माग देखील एक कारण आहे. ते म्हणजे काँग्रेसचा केंद्रात असलेला दबदबा आणि त्यावेळी देशात असलेली काँग्रेसची लाट. त्यावेळी देशाच राजकारण हे काँग्रेसकेंद्री होते. आज परिस्थिती बदललेली आहे. आज भाजप हा देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. आज देशातले राजकारण हे भाजप केंद्रीय आहे. त्यामुळे अजित पवार यांना आपली भविष्यातील राजकीय कारकीर्द मजबूत ठेवायची असेल, तर या बदलत्या राजकारणाचा देखील विचार व्हायला हवा.