मुंबई - भारतीय जनतेने स्वातंत्र्याच्या लढाईत गोऱ्यांना पळवले होते. आता आम्ही केंद्रात बसलेल्या चोरांना पळवून लावू, असा इशारा विद्यार्थी नेता उमर खलिदने आज मुंबईत दिला. तसेच एनाआरसी आणि सीएए कायद्याविरोधात देशातील विविध संघटनांनी आपले झेंडे बाजूला ठेऊन केवळ तिरंग्याच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहनही त्याने यावेळी केले.
हेही वाचा - "नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोधक मुस्लिम समाजात भीती पसरवत आहेत"
छात्रभारती विद्यार्थी संघटना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याविरोधातील परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होता. यावेळी विद्यार्थी नेता प्रदीप नरवाल जेएनयूमधील विद्यार्थी नेता राम नागा, जामिया विद्यापीठातील हम्मा दूर रहमान, सलमान इम्तियाज साथिया शेख आधी विद्यार्थी नेते उपस्थित होते.
'मी देशविरोधी नारे दिले म्हणून माझ्या विरोधात खटला दाखल केला पण चार वर्षात सुनावणी का झाली नाही? गृहमंत्री अमित शहा यांना खुले आव्हान देतो, त्यांनी माझ्यावरील खटला न्यायालयात चालवावा, आणि चार वर्षात का यावर सुनावणी झाली नाही याचे उत्तर द्यावे." असे खलिद यावेळी म्हणाला.
मोदींनी केंद्रातील शिक्षणासाठी बजेट कमी केले, आणि दुसरीकडे एकही नवीन संस्था, विद्यापीठ उभे करू शकले नाही. मात्र, सध्या आहेत त्या संस्था बंद करण्याचे प्रयोग करत आहेत. आम्ही सरकार निवडले होते, पण खोटे बोलण्याची कंपनी निघाली असा टोलाही खलिदने मोदी सरकारला लागावला. हे लोक विकासासाठी आले नव्हते तर देशाच्या विनाशासाठी आले होते, म्हणूनच आज ते असे कायदे आणून जनतेला विभागून टाकत आहेत.
पाकिस्तानातील पंतप्रधानाला भारतातील मुस्लिमांचा कळवळा आहे तर पाकिस्तानातील मुस्लिमांचा भारतातील पंतप्रधानांना कळवळा आहे. म्हणून ते रोज आपल्या देशातील मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाचा विचार न करता दुसऱ्या देशातील मुस्लिम होत असलेल्या अन्यायावर बोलत असतात. दोघांचेही षड्यंत्र भारतीय मुस्लिमांनी ओळखले आहे, आम्ही हिंदुस्तानी मुस्लिम असून आम्हाला हिन्दुस्तानी असल्याचा अभिमान आहे. त्यामुळे पाकिस्तानात असलेल्या लोकांनी आमच्या बद्दल कोणताही कळवळा व्यक्त करू नये, अशा शब्दात उमर खालिद ने पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर टीका केली.