मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ५० पेक्षा जास्त तरुणांना खरी श्रद्धांजली असल्याचे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. मराठा समाजाची बाजू एकूण घेतल्याबद्दल त्यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले.
मराठा आरक्षणाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात अंतिम निर्णय घेण्यात आला. नोकरी आणि शिक्षणात मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. १६ टक्के आरक्षण देणे शक्य नाही. मात्र, १२ ते १३ टक्के आरक्षण मराठा समाजाला देता येऊ शकते. आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयावर उदयनराजे यांनी समाधान व्यक्त करत उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत.
मराठा आरक्षणाची आज उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील लढत आहेत. महाराष्ट्रातील सर्व धर्मीय व जातीय समाज बांधवांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचे उदयनराजे म्हणाले.