मुंबई Uddhav Thackeray vs Eknath Shinde : शिवसेनेच्या आमदार अपात्रप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर गुरुवारी सुनावणी झाली. तब्बल तीन तासाच्या युक्तिवादानंतर सुनावली संपली असली, तरी अजूनही यावर निर्णय प्रलंबित आहे. पुढील सुनावणी 20 ऑक्टोबरला होणार आहे. शिवसेनेच्या दोन प्रतिस्पर्धी गटांनी परस्पर दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकत्र सुनावणी झाल्यास आमच्यावर अन्याय : गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये शिंदे गटाच्या वतीनं युक्तिवाद करताना वकील देवदत्त कामत यांनी सर्व आमदारांना वैयक्तिक बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं. एकत्र सुनावणी घेतली जावी, अशी ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी आहे. मात्र तर तसं केल्यानं शिंदे गटाच्या आमदारांवर अन्याय झाल्यासारखं होणार आहे. त्यामुळे याचिका एकत्र केल्या तर तो त्यांचा अधिकार राहणार नाही, असंही देवदत्त कामत यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी आम्ही अध्यक्षांना लवकर सुनावणी घेण्यास सांगितलं असून 20 तारखेपर्यंत निर्णय अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आजचे तिन्ही अर्ज हे ठाकरे गटाचे असून आम्ही अर्ज केले नाहीत. याप्रकरणी आम्ही सर्व सहकार्य करणार आहोत. आज त्यांच्या अर्जावर युक्तिवाद झाला. जर या प्रकरणी लवकर निकाल हवा असेल, तर ठाकरे गटानं ते ठरवावं, असंही देवदत्त कामत यांनी म्हटलं आहे.
पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल : कायद्याचा किस पाडण्याचा वारंवार प्रयत्न होत असल्याची प्रतिक्रिया आजच्या सुनावणीनंतर ठाकरे गटाचे नेता अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं. शिंदे गटांच्या आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची तलवार लटकत असून ते टाळण्यासाठी हे सर्व सुरू आहे. याप्रकारे फक्त चालढकल करण्यात येत आहे. याप्रकरणी एकत्र सुनावणी का नको आहे? असा अध्यक्षांनी सुद्धा आज प्रश्न विचारला आहे. परंतु एकंदरीत हे चित्र असं दिसतं की, या प्रकरणी लवकर निर्णय येणार नाही. म्हणून आम्हाला पुन्हा एकदा याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे, असंही अनिल देसाई म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार अपात्र : शेड्युल 10 प्रमाणे शिंदे गटाचे आमदार हे अपात्र आहेत, असं ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी स्पष्ट केलं. आम्हाला, जनतेला आणि महाराष्ट्राला जे अपेक्षित आहे, ते सर्वांना माहीत आहे. याप्रकरणी अध्यक्षांनी एकत्र सुनावणी घेऊन लवकरात लवकर निर्णय द्यावा, हीच आमची अपेक्षा आहे. या प्रकरणाचं चित्र एकदम स्पष्ट असून निर्णय आमच्या बाजूचा आहे, असा विश्वास सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :