मुंबई - मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील खंडित झालेली वीज टप्पाटप्प्याने सुरू होत आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
रुग्णालयांना वीजपुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी. ज्यामुळे अडचण होणार नाही. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत. यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले आहे.
उपनगरी रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.