मुंबई - राज्यात आणीबाणी म्हणणाऱ्यांनी देशातील स्थिती पाहावी. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्यावर कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे मारले जात आहेत. मग ती काय घोषित आणीबाणी आहे का? असा संतप्त सवाल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाला विचारला आहे. आज महाविकास आघाडीच्यावतीने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार उपस्थित होते.
फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर...
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अघोषित आणबाणी असल्याची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? दिल्लीत भर थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावर थंड पाण्याचे फवारे मारले जात आहेत. त्यांना देशद्रोही म्हटले जात आहे. ही काय सद्भावनेची गोष्ट आहे का? असा प्रश्नही ठाकरेंनी विचारला.
ही आणिबाणी नाही का? ठाकरेंचा सवाल
कामगार, शेतकऱ्यांच्या न्याय हक्काबाबत कोणी बोलले तर ते देशद्रोही. विरोधात बोलले आणि तुरुंगात टाकणे ही आणिबाणी नाही का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधी नेत्यांना विचारला. महाराष्ट्रातील नेत्यांनी कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी किती चांगला हे दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जाऊन सांगावे. येथे का बोलत आहेत, असे देखील ठाकरे यांनी सांगितलं.
प्रविण दरेकर यांच्याविषयी काय म्हणाले ठाकरे...
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना ताब्यात घेण्याविषयी आमच्या सरकारमध्ये कुणीही काही बोललेले नाही. पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आम्हाला हे काही सुचवू पाहात आहेत का? जर दरेकर यांना ताब्यात घेण्याबद्दल फडणवीसांकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी जरुर द्यावेत, असा टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला.
'कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार निर्णय घेणार'
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध संघटना आणि नेत्यांशी सरकारची चर्चा सुरू आहे. आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता निर्णय घेऊ. विरोधकांनी ओबीसी समाजात गैरसमज निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
सोमवारपासून सुरु होतंय अधिवेशन..
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. राज्यशासन गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनासारख्या आजारासोबत यशस्वी लढा देत आहे. याकाळात जनहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले, असे सांगतानाच हिवाळी अधिवेशनात अध्यादेश, विधेयक, पुरवण्या मागण्या, विनियोजन बिल, शोकसंदेश असे कामकाज असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
- सरकार पाडण्याचा मुहूर्त शोधण्यात विरोधकांचे वर्ष गेले - मुख्यमंत्री ठाकरे
- घरगुती कामगारांप्रमाणे केंद्र सरकार सरकारी संस्थांचा वापर करत आहे. हे सर्व खेळ जनता पाहते आहे - मुख्यमंत्री ठाकरे
- केंद्राकडून जीएसटीचे पैसे येणे बाकी आहेत. सरकार अडचणीतून मार्ग काढत आहे - उपमुख्यमंत्री अजित पवार
हेही वाचा - रंगबिरंगी कपड्यांशिवाय मला मंत्रालयात कसे येता येईल? रामदास आठवले म्हणाले..
हेही वाचा - जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोडसाठी 1 हजार 700 झाडांची होणार कत्तल