मुंबई - राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे एक बेधडक व्यक्तिमत्व होते. बॅरिस्टर कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंतुले असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अंतुले यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. मन की बात और दिल की बात यात फरक असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच अंतुले साहेबांचे वेगळे रुप या पुस्तकातून समोर आले असून, त्यांची दिल की बात काय ते समजल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथे अंजुमन इस्लाम, मुंबई संस्थेने नविन सुरु केलेल्या विधी पदवी महाविद्यालयाचे नामकरण 'बॅरिस्टर ए. आर. अंतुले विधी महाविद्यालय' असे केले आहे. हा नामकरण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच यावेळी अंतुले यांनी लिहिलेल्या निवडक पत्रांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
विधी महाविद्यालयाचे नामकरण माझ्या हस्ते होत आहे, ही भाग्याची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शाळेमध्ये जे संस्कार होतात ते आयुष्यभर पुरतात, आत्ताच्या काळात संस्कार हे खूप गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या देशाला जो आपला मानतो तो आपलाच, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो असेही ठाकरे म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलामनबी आझाद, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक, जेष्ठ गीतकार साहित्यिक जावेद अख्तर, खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, अंजुमन ए इस्लाम संस्थेचे अध्यक्ष झहिर ए. काझी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुखांचा मुलगा अंजुमन इस्लाममध्ये काय करतोय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. काँग्रेसबरोबर झालेली युती, यामुळे धर्मांतर झाले काय? असे अनेकांना वाटले असेल. परंतू, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बॅरीस्टर अंतुले यांची अतूट मैत्री होती. ही मैत्री त्यांनी कधीही लपवली नाही. १९६० च्या दशकापासून मी त्यांची मैत्री जवळून पाहत आलो आहे. बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला याचा गर्व अंतुले साहेबांनाही झाला असता असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, सध्या समोर अंधार पसरला आहे. यातून युवा शक्तीला दिशा देऊन सामर्थ्यशाली करू शकलो नाही तर उपयोग काय? असा सवाल त्यांनी केला. कोणत्या दिशेने जायचे हे कळले नाही तर देश महासत्ता होऊ शकणार नाही. एनआरसी आणि सीएए वरून देशात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, हिंदू मुस्लिम हा विषय सध्या चर्चेत आहे. मात्र हिंदू असो किंवा मुस्लिम ते त्यांच्यात बंधुभाव आहे. उगाच उठायचं आणि दगडफेक करायची याला अर्थ नाही. दगडाने डोकं फोडता येते, मात्र, त्याच दगडाचा चांगला वापर करून भक्कम इमारत उभी करता येते. याच दगडाला शेंदूर फासला की, त्याला दैवत्व प्राप्त होते. या दगडाचा कसा वापर करायचा याची शिक्षण देणाऱ्या शाळा महाविद्यालयांची गरज आहे. शतकानुशतके अंजुम इस्लाम हे काम करत राहो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.